संजय सूर्यवंशी, नांदेड प्रतिनिधी
Nanded Drought Review Meeting : मराठवाड्यासह राज्यात पावसाची मोठी तूट आहे. यंदा कमी पाऊस पडल्याने दुष्काळाची परिस्थिती ओढावली आहे. मराठवाड्यातील शेतकरी चिंतेत सापडला असून पिके करपून जात आहेत. अशा भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी नांदेडच्या जिल्हा नियोजन सभागृहात शनिवारी आढावा बैठक पार पडली. पण दुष्काळग्रस्त भागातील समस्यांवर गांभीर्याने चर्चा करण्यासाठी बैठकीला असणारे नेते आणि अधिकारी काजू-बदामाचा आस्वाद घेत असल्याचे समोर आले. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी जोरदार टीका केली असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
वातानुकूलित सभागृहात काजू-बदाम अन् शेतकरी चिंतेत
मराठवाड्यात यंदा पावसाची तूट पडल्यामुळे सोयाबीन आणि कापसाची पिके सुकू लागली आहेत. सोयाबीनच्या शेंगा भरलेल्या नाहीत, तर कापसाची वाढ खुंटल्याने वर्षाभराची मेहनत वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी डोळ्यात अश्रू आणून संकटाचा सामना करत आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांच्या नावाखाली घेतलेल्या बैठकीत एसी सभागृहात टेबलावर काजू-बदामाच्या प्लेटा पाहायला मिळत आहे. त्यामुळे ‘ही बैठक दुष्काळावर चर्चा करण्यासाठी होती की काजू-बदाम खात गप्पा मारण्यासाठी?’ असा संतप्त सवाल सर्वसामान्यांमधून विचारला जात आहे.
नेते आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल आणि कृषी विभागाची ही महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार रवींद्र चव्हाण, खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार संजय जाधव यांच्यासह नांदेड, परभणी आणि हिंगोलीतील अनेक आमदार प्रत्यक्ष व ऑनलाईन (आभासी) पद्धतीने उपस्थित होते. सोबतच प्रशासकीय अधिकारीही या आढावा बैठकीला उपस्थित होते.
अधिकारी काजू-बदाम आणतात आणि बदनाम आम्ही होतो
या प्रकारावर प्रतिक्रिया देताना मंत्री संजय शिरसाट यांनी अधिकाऱ्यांवर खापर फोडले आहे. "माझे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने मी बैठकीला गेलो नाही. उद्या मी स्वतः शेतकऱ्यांना भेटायला जाणार आहे. दत्ता भरणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत आणि तिथे अधिकारी उपस्थित होते. पण अधिकारीच असे काजू-बदाम आणून ठेवतात आणि बदनाम मात्र लोकप्रतिनिधी होतात," असे स्पष्टीकरण देत याबाबत विभागीय आयुक्तांना आवश्यक सूचना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा प्रकार
या बैठकीचा मूळ उद्देश पावसाअभावी निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती, पिकांची सद्यस्थिती आणि शेतकऱ्यांना मिळणारी मदत यांचा आढावा घेणे हा होता. आढाव्यानंतर प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करण्याचाही कार्यक्रम होता. मात्र, बैठकीतील या काजू-बदामाच्या नाश्त्यामुळे दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.