मुंबई : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यावर ईडीच्या चौकशीचा (Enforcement Directorate) ससेमीरा सुरुच आहे. त्यामुळे देशभरात कॉंग्रेस केंद्र सरकारविरोधात आक्रमक झाली असून विविध ठिकाणी मोदी सरकारविरोधात (central government) निदर्शने सुरु आहेत. सोनिया गांधी यांची ईडीकडून केली जात असलेली चौकशी केंद्रातील मोदी सरकारच्या इशाऱ्यावरून केली जात आहे. २०१५ साली मोदी सरकारनेच नॅशनल हेराल्ड प्रकरणात (National Herald) काही तथ्य नसल्याने बंद केले होते. परंतु महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस पक्ष, सोनिया गांधी, राहुल गांधी यांना केंद्र सरकार नेहमीच धारेवर धरत आहे. ईडीच्या माध्यमातून गांधी कुटुंबाला त्रास दिला जात आहे. काँग्रेस पक्ष अशा हुकूमशाहीसमोर झुकणार नाही, तर त्याविरोधात आरपारची लढाई लढेल,असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष (Nana Patole) नाना पटोले यांनी दिला आहे.
केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ईडी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री डॉ.नितीन राऊत,वर्षा गायकवाड,अस्लम शेख,प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान,चंद्रकांत हंडोरे,महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे,खजिनदार डॉ.अमरजितसिंह मनहास,अमर राजूरकर,राजेश राठोड,खासदार संजय निरुपम, मधू चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आशिष दुआ,मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे,प्रदेश सरचिटणीस प्रमोद मोरे,देवानंद पवार,राजेश वर्मा, राजन भोसले,जो.जो.थॉमस,मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजितसिंग सप्रा,मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दीकी,प्रवक्ते सुरशेचंद्र राजहंस यांच्यासह सर्व आघाडी व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्याने उपस्थित होते.
माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, केंद्र सरकारविरोधात जनतेत प्रचंड आक्रोश आहे. मोदी सरकारच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. विरोधकांना नाहक त्रास देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. नॅशनल हेराल्ड वर्तमानपत्रात स्वातंत्र्य चळवळीत इंग्रज सत्तेविरोधात आवाज उठवलेला आहे. ज्यांचा स्वातंत्र्यचळवळीत काहीही संबंध नाही हे लोक आज देश विकून देश चालवत आहेत.
नाशिक येथे माध्यमांशी बोलताना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले,देशात महागाई प्रचंड वाढली आहे. अन्नधान्य,दूध,दही, पनीर,मीठ,आट्यावरही मोदी सरकारने जीएसटी लावून सामान्यांचे जगणे कठीण केले आहे. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. अर्थव्यवस्था रसातळाली गेली आहे. मोदी सरकारकडे यावर उत्तर नाही म्हणून देशातील ज्वलंत प्रश्नावरून लक्ष वळवण्यासाठी काँग्रेसला जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, देशात सर्वसामान्य जनतेचे जगणे महागाईने कठीण केले आहे.बेरोजगारी वाढली आहे,देशातील एक एक कंपनी विकली.यावर सोनिया गांधी,राहुल गांधी व काँग्रेस पक्ष जाब विचारतो म्हणून त्यांचा आवाज दाबण्यासाठी सुडबुद्धीने कारवाई केली जात आहे. मोदी सरकार स्वतःचे अपयश लपवण्यासाठी व जनतेचे लक्ष दुसरीकडे वळण्यासाठी केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून काँग्रेसला घाबरवत आहेत, पण काँग्रेस याला भीक घालणार नाही.
पुण्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी मंत्री सतेज पाटील,विश्वजित कदम,प्रणिती शिंदे,प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी व पश्चिम महाराष्ट्रीत सर्व जिल्हाध्यक्ष व कार्यकर्ते यांनी आंदोलनात भाग घेतला. नागपूर येथील ईडी कार्यालयावर माजी मंत्री सुनिल केदार,विकास ठाकरे, राजेंद्र मुळक यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.अमरावती विभागात यशोमती ठाकूर,डॉ.सुनिल देशमुख, उत्तर महाराष्ट्र विभागात माजी मंत्री व विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात,सुधीर तांबे यांनी आंदोलनात सहभाग घेतला.मुंबईत आंदोलन करणारे नाना पटोले,भाई जगताप यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले.
Edited By - Naresh Shende
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.