काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अलिकडेच २ राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी वक्तव्ये केली. चव्हाण यांनी थेट देशाचा पंतप्रधान लवकरच बदलणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. देशाच्या पंतप्रधानपदी नागपुरातील भाजपच्या नेत्याला संधी मिळण्याची शक्यता आहे, असा दावाही त्यांनी केला. विशेष म्हणजे त्यांनी १९ डिसेंबरही तारीखही दिली. त्यांनी १९ डिसेंबर तारीखमागचं कारण सांगितलं. प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना त्यांनी याबाबत माहिती दिली. तसेच स्वपक्षातील काही नेत्यांना चांगलाच चिमटा काढला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, '१९ डिसेंबरला आता काही दिवस उरलेत. अमेरिकेत या दिवशी काही कागदपत्रे समोर येतील, यामुळे जगात खळबळ उडण्याची शक्यता आहे. या उलथापालथीचा भारतावरही परिणाम होऊ शकतो. कदाचित भारताचा पंतप्रधान बदलू शकतो. तर, भारताचा नवा पंतप्रधान हा मराठी माणूस असू शकतो', असा मोठा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
'यात ३ नावं आजी माजी खासदार आहेत. नंबर १ पदाबाबत बदल होऊ शकतो. मराठी माणूस पंतप्रधान होवू शकतो', असं चव्हाण म्हणाले. 'बरेच काही राजकारण वर्षभरात घडले आहे. विधानसभांच्या निवडणूकीमध्ये आतिआत्मविश्वासामुळे आम्हाला फटका बसला. बऱ्याच जणांनी गुडग्याला बाशिंग बांधले होते. काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल, असा त्यांचा विश्वास होता', असं म्हणत त्यांनी स्वपक्षातील काही नेत्यांचा चिमटा काढला.
निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कमी झाली
निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कमी झाली आहे, असं चव्हाण म्हणाले. 'राहुल गांधीनी मोठा मुद्दा हाती घेतलाय. तो म्हणजे बोगस मतदानाचा. यामुळे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता कमी झाली आहे. ओबीसी मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. जिथं करता येईल तिथं भाजपने पोलराईस केले', असंही चव्हाण म्हणाले.
'यावेळी पराभूत झालेल्या उमेदवारांना सांगितले की, याचिका दाखल करा. आम्ही याचिका दाखल केलेल्या आहेत त्यांची सुनावणी सुरू आहे. मी पण याचिका दाखल केलेली आहे. आमच्या मतदारसंघात बोगस मतदान नोंदणी केलेली आहे. काँग्रेस पक्षाचे २८८ मतदारसंघातील माहिती गोळा केलेली आहे. निवडणूक निकाल लागला की सर्वच म्हणतात माझ्यावर अन्याय झाला. निवडणूक आयोगाने योग्य काम केले पाहिजे', असंही चव्हाण म्हणाले.
'मतदानावेळी एका माणसाला एकाच ठिकाणी मतदान करता येते...पण एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस मतदान कसं काय शक्य आहे?', असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला. 'माझ्या मतदार संघात १२ हजार बोगस मतदार आहेत', असा दावाही त्यांनी यावेळी केला. 'निवडणूक आयोगाची ही जबाबदारी आहे की, मतदार यादीत पारदर्शकता हवी. मला गेल्यावेळच्या निवडणुकीपेक्षा जास्त मते पडली. तरी देखील माझा पराभव कसा झाला?', असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
'निवडणूक आयोगाला करणं शक्य आहे पण ते करत नाही कारण त्यांना सत्ताधारी पक्षाला लाभ मिळवून द्यायचा आहे', असा घणाघातही यावेळी त्यांनी केला. 'हे जे काय चाललंय याला भाजपचे केंद्रीय नेतृत्व जबाबदार आहे. नरेंद्र मोदी या मुद्द्याला जबाबदार आहेत', असा घणाघातही चव्हाण यांनी केला. 'महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. पण तो बाहेर काढायला आम्ही कमी पडत आहोत', अशी खंतही यावेळी त्यांनी व्यक्त केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.