बीडमध्ये १४ वर्षीय मुलीचा बेकायदेशीर बालविवाह
बनावट आधारकार्डद्वारे वय लपवण्याचा प्रयत्न
AHTU टीमने वेळीच कारवाई करत मुलगी वाचवली
आई-वडील व सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल
माधव सावरगावे, बीड
एकीकडे बालविवाहाला बंदी असताना दुसरीकडे बीडमध्ये एका १४ वर्षीय मुलीचा बालविवाह करण्यात आला आहे. शिवाय बनावट आधारकार्ड तयार करून त्यावर खोट्या जन्मतारखेची नोंद करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करून मुलीचे आई वडील आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. शिवाय याप्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या प्रभारी अधिकारी, पोलीस उप निरीक्षक पल्लवी जाधव यांनी गुप्त बातमीदारामार्फत बीडमध्ये १४ वर्षाच्या मुलीचा बालविवाह होत असल्याची माहिती मिळाली. अल्पवयीन मुलीचा ज्या तरुणाशी विवाह झाला आहे तो व्यक्ती देखील बीडमधील पिंपळादेवी मधीलच असल्याचे समजले. क्षणाचाही विलंब न करता AHTU टीम पिंपळादेवी गावात दाखल झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, बालविवाह झालेल्या घरी टीम गेली असता, अल्पवयीन मुलगी घरी मिळून आली. तिला विश्वासात घेवून तिचे समुपदेशन केले व तिला तिच्या लग्नाबाबत विचारपूस केली. तिने सांगितले की, तिचा विवाह २३ जानेवारी २०२६ रोजी साई सिध्दी हॉल गेवराई शहर येथे, सिद्धार्थ मधुकर आवारे याच्यासोबत झाला.
सदर पीडित मुलगी मधुकर आवारे यांच्या घरात मिळून आल्याने,पोलिसांनी मधुकर आवारे आणि त्यांचा मुलगा सिद्धार्थ आवारे यांना ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी पोस्टे गेवराई येथे हजर केले. तसेच पीडित मुलीचे आईवडील यांना फोन करून पोस्टे गेवराईला हजर होण्यास सांगितले. गेवराई येथे गेल्यावर PSI पल्लवी जाधव यांनी साई सिध्दी हॉलच्या मॅनेजरकडे चौकशी केली. या चौकशीदरम्यान धक्कादायक बाब उघडकीस आली. पीडित मुलीच्या आई वडिलांनी आधारकार्डवरील जन्म तारिख बदलून बनावट आधारकार्ड बनवलं असल्याचं समजलं. ज्यात तिचे वय १९ दाखवण्यात आले होते. ते कागदपत्रे ताब्यात घेवून पोस्टेला जमा करण्यात आले.
याप्रकरणी 5 आरोपींविरुद्ध 47/2026 कलम 9, 10,11बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये गुन्हा दाखल केला. PSI पल्लवी जाधव यांनी पीडित मुलीच्या काळजी व संरक्षणासाठी तिला बालकल्याण समिती बीड यांचे समक्ष हजर केले. सदर कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली, PSI पल्लवी जाधव, पोलीस हवालदार उषा चौरे, शोभा जाधव, प्रदीप येवले, अशोक शिंदे , पोशी गजानन चौधरी सर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष बीड यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.