मुसळधार पावसामुळे कन्नड तालुक्यात दोन दुर्दैवी घटना घडल्या आहेत.
निपाणी गावातील दोन वर्षीय चिमुकली प्रांजल नदीपात्रात वाहून गेली.
पिशोर गावात १० वर्षीय श्रावण मोकासे पुलाजवळून नदीत पडला.
या घटनेने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
राज्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे. या अतिवृष्टीचा फटका सर्वात जास्त प्रमाणावर शेतकऱ्यांना बसला आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यात २ धक्कदायक घटना घडल्या आहेत. या घटनेत शेतकऱ्याची दोन वर्षीय चिमुकली अंगणात खेळत असताना नदी पात्रात वाहून गेली आहे. तर दुसऱ्या घटनेत एका पुलावरून १० वर्षीय चिमुकला वाहून गेला आहे. दरम्यान या घटनेने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील निपाणी गावात राहणाऱ्या प्रकाश कदम हे नदीपात्राशेजारी असलेल्या शेत वस्तीवर राहतात. त्यांच्या शेतातील घरापासून ३० मीटरच्या अंतरावर नदीपात्र आहे. कदम यांची दोन वर्षीय चिमुकली प्रांजल ही अंगणात खेळत असताना नदीच्या दिशेने गेली. खेळता खेळता चिमुकली नदीपात्रात वाहून गेली. प्रांजल अंगणात दिसत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी शोधाशोध केली, मात्र ती त्या ठिकाणी आढळून आली नाही. म्हणून कुटुंबियांना ती नदीपात्रात वाहून गेल्याचा संशय बळावला.
कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. उपविभागीय अधिकारी संतोष गोरड यांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याठिकाणी NDRF च्या पथकाला बोलावून शोध मोहीम राबविली. मात्र नदीच्या आजूबाजूला झाडी असल्याने अद्यापही या चिमुकलीचा शोध लागलेला नाही.
दुसरीकडे कन्नड तालुक्यातील पिशोर येथे शनिवारी रात्री परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने पिशोर येथील बाजारपट्टी व रामेश्वर वस्ती रस्त्याला जोडणाऱ्या पुलावरुन पाणी वाहत आहे. सोमवारी प्रशासनाने खबरदारी म्हणून शाळांना सुटी जाहीर केलेली होती. त्यामुळे श्रावण मोकासे हा दुपारी दोन वाजता नदीच्या पलीकडील त्याच्या शेतात जात होता. पुलाची उंची कमी असल्याने श्रावण या पुलाजवळ शेताच्या कडेने जात असताना त्याचा पाय घसरून तोल गेला व तो नदी पात्रात पडला.
पुलावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांच्या ही घटना लक्षात येताच त्यांनी तात्काळ पाण्यात उतरून शोध घेण्यास सुरुवात केली. घडलेल्या घटनेनंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी जवळपास चाळीस ते पन्नास तरुणांनी नदीपात्रात दुरपर्यंत श्रावणचा शोध घेतला. परंतु संध्याकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. या दोन्ही घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.