Chhagan Bhujbal statement on NCP merger latest news : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कोअर कमिटीची पार पडलेली बैठक सध्या जोरदार चर्चेत आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या या भेटीनंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. "ही भेट केवळ अर्थ खात्यासंदर्भात होती; विलीनीकरणाचा मुद्दा कायमचा बंद झाला आहे," असे भुजबळ यांनी सांगितले. तर दुसरीकडे, पक्षाचे नेते अनिल पाटील यांनी या भेटीबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे सांगत वेगळाच दावा केला आहे.
"अर्थ खाते आमचेच, ते लवकरात लवकर मिळावे!" - छगन भुजबळ
बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले, "सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले अर्थ खाते लवकरात लवकर पक्षाला परत मिळाले पाहिजे, हीच आमची मुख्य मागणी होती आणि यावर अत्यंत सकारात्मक चर्चा झाली आहे. मुख्यमंत्री स्वतः म्हणाले आहेत की, आपल्याला ते द्यायचे आहे."
मंत्रिमंडळात मोठे बदल होणार असल्याच्या चर्चा भुजबळ यांनी फेटाळून लावल्या. "कोणतेही मंत्री बदलणार नाहीत किंवा तसा कोणताही अजेंडा नाही. सध्या राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मोठी रक्कम तयार करायची आहे. पूर्वी काँग्रेसच्या काळातही नवीन जागा आल्यावर असे बदल व्हायचे. पण मंत्रिमंडळ विस्तार किंवा बदल केव्हा होईल, हे केवळ मुख्यमंत्र्यांनाच ठाऊक आहे." तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या बातम्या फेटाळत "हा मुद्दा कायमचा बंद झाला असून या केवळ माध्यमांमधील चर्चा आहेत," असा टोलाही त्यांनी लगावला.
"बैठकीबाबत मला कोणतीही कल्पना नाही" - अनिल पाटील
आमदार अनिल पाटील यांना या भेटीबाबत विचारले असता ते म्हणाले, "वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक नेमकी कशासाठी झाली, याबाबत मला काहीही कल्पना नाही. आगामी जिल्हा परिषद, जिल्हा बँका आणि पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी काही नेते गेले असावेत. अर्थ खात्याबाबत तिथे चर्चा झाली असेल असे मला वाटत नाही."
पुढे बोलताना पाटील म्हणाले, "अर्थ खात्याबाबतचा अंतिम निर्णय पक्षातील वरिष्ठ नेते आणि मुख्यमंत्री मिळून घेतील. राज्यातील विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठीच पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असावेत."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.