बुलढाणा : मेहकर तालुक्यात ढगफुटी सदृश मुसळधार पावसाने थैमान घातले. मेहकर व लोणार तालुक्यातील अनेक गावांमध्ये पेरण्या उलटल्या असून, जमिनी खरडून गेल्या आहेत. मागील ३४ वर्षांमध्ये एवढ्या प्रमाणात पाऊस झालेला नव्हता, असे जुनी जाणकार मंडळी सांगत आहे. दरम्यान आज ॲड. जयश्री शेळके यांनी मेहकर तालुक्यातील कल्याणा मंडळातील बार्हई शिवारात काही नुकसानग्रस्त शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली.
राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर व लोणार तालुक्यात जोरदार पाऊस असा ढगफुटी सदृश्य असा पाऊस झाला आहे. सामान्यतः ६५ मिलिमीटरहून अधिक पाऊस अतिवृष्टीत गणला जातो. मात्र या दोन तालुक्यांमध्ये कमाल १९३ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून पिके देखील वाहून गेली आहेत.
२३ हजार हेक्टर क्षेत्र बाधित
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिके उध्वस्त झाली असून, शेतकऱ्यांवर पुन्हा पेरणीचे मोठे आर्थिक ओझे येणार आहे. मुसळधार पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद, तूर, हळद तसेच भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तर कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार मेहकर तालुक्यातील सुमारे २३ हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीने बाधित झाले असून, सुमारे ४८ हजार शेतकरी अडचणीत सापडले आहेत. विशेषत: मेहकर तालुक्यात दीड हजार हेक्टरवर झालेल्या सोयाबीनच्या पेरण्या पाण्याखाली गेल्या आहेत.
पंचनामे करून मदतीची मागणी
या नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दरम्यान ॲड. शेळके यांनी उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून मेहकर व लोणार तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी केली. तसेच, पंचनामे करताना शेतकरी बांधवांचे सोलर पॅनल, ठिबक व स्प्रिंकलर पाईप यांचे नुकसान झाल्यास त्याचाही तपशील नोंदवावा आणि शासनामार्फत तातडीची मदत शेतकऱ्यांना पुन्हा पेरणीसाठी द्यावी, अशी विनंती केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.