योगेश काशीद, साम टीव्ही
बीड: जिल्ह्यातील म्हाळस जवळा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादाचा राग मनात धरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली असून या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे पीडित कुटुंबात दहशतीचे वातावरण पसरले असून न्याय न मिळाल्यास संपूर्ण कुटुंब आत्महत्येच्या मनस्थितीत असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर खांडे यांचा भाऊ फाट्यावरून घराकडे जात असताना ही घटना घडली. त्या ठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या कुंडली खांडे आणि त्याच्या साथीदारांनी त्याला अडवले. तुझ्या भावाला सांग आमच्यावरचा गुन्हा मागे घे, अशी धमकी त्यांनी दिली. मात्र, मला याबद्दल काही माहिती नाही, असे सांगून तो पुढे निघाल्यावर आरोपींनी पाठीमागून पाठलाग केला आणि त्याला रक्तबंबाळ होईपर्यंत अमानुष मारहाण केली.
या हल्ल्यानंतर जखमी तरुणावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने ज्ञानेश्वर खांडे यांनी संताप व्यक्त केला आहे. या गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे आमचे पूर्ण कुटुंब दहशतीत आहे. आधी माझ्यावर हल्ला केला, आता भावावर केला. जर या गुंडांना वेळीच आळा घातला नाही, तर माझे चुलते आणि संपूर्ण कुटुंब आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहे. आम्हाला गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे, असे ज्ञानेश्वर खांडे यांनी सांगितले.
माझी पोलीस अधीक्षकांकडे एकच मागणी आहे की, या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कडक प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि माझ्या कुटुंबाला संरक्षण द्यावे. अशी मागणी ज्ञानेश्वर खांडे यांनी केली आहे. या घटनेनंतर आता पोलीस प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.