योगेश काशिद, बीड प्रतिनिधी
Kunbi caste certificate Maharashtra : बनावट कुणबी नोंदीच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवून नगरसेवक पद लाटणाऱ्या सौ. रेखा अंकुश अंबुरे-सरवदे यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मोठा दणका दिला आहे. समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र बेकायदेशीर ठरवत ते रद्द करून जप्त केले आहे. या कारवाईमुळे माजलगावच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्याचे संकेत मिळत आहेत.
अशी केली प्रशासनाची दिशाभूल
सौ. रेखा अंबुरे-सरवदे यांनी मौजे कुप्पा येथील 'सावंत' कुटुंबाच्या वंशावळीतील नामसादृश्याचा गैरफायदा घेतला होता. आपल्या खापर पणजोबांच्या नावाचा गैरवापर करत त्यांनी नमुना क्रमांक ३३ आणि ३४ मधील नोंदीच्या आधारे उपविभागीय अधिकारी कार्यालयातून कुणबी जात प्रमाणपत्र लाटल्याचे तपासात निष्पन्न झाले.
दरम्यान, मूळ सावंत कुटुंबातील वारसदार यशवंत संभाजी सावंत आणि पृथ्वीराज दादासाहेब सावंत यांनी १९६७ पूर्वीचे शेतपुस्तक, प्रतवारी पत्रके आणि महसुली पुरावे सादर करत आपले जात वैधता प्रमाणपत्र सिद्ध केले. निवडणुकीच्या वेळीच सौ. सुमन माणिकराव मुंडे यांनी याप्रकरणी आक्षेप घेतला होता. अखेर सर्व पुराव्यांची पडताळणी करून बीडच्या जात पडताळणी समितीने हे बनावट प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला.
एकाच नोंदीवर दोन वेगवेगळ्या आडनावांना दाखले; उपविभागीय अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात
माजलगावचे उपविभागीय अधिकारी गौरव इंगोले यांच्या भूमिकेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकाच कुणबी नोंदीच्या आधारे दोन वेगवेगळ्या आडनावांच्या व्यक्तींना अवघ्या ५ दिवसांत जात प्रमाणपत्र कसे दिले गेले? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
या संपूर्ण गैरप्रकारात प्रशासकीय संगनमत असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, आमदार प्रकाश सोळंके यांच्यामार्फत तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा प्रशासनावर राजकीय दबाव आणल्याचा आरोपही होत आहे. त्यामुळे या संपूर्ण घोटाळ्याची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.