अमित गवळे, प्रतिनिधि
पाली: दुर्गम गडकिल्ल्यांचा इतिहास आणि त्यांचा अनमोल ठेवा जतन करण्यासाठी शिवशंभो प्रतिष्ठान रोहा व सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था यांनी अवचितगड येथे एक अत्यंत थरारक आणि कौशल्याने परिपूर्ण अशी संयुक्त मोहीम शनिवारी (ता. 20) यशस्वीपणे पार पाडली आहे. या मोहिमेअंतर्गत गडाच्या अवघड दरीतून दोन ऐतिहासिक तोफांना सुरक्षितपणे वर आणून गडावर पुन्हा स्थापित करण्यात आले.
या मोहिमेची सुरुवात १२ ते १५ जून २०२६ दरम्यान शिवशंभो प्रतिष्ठानच्या सदस्यांनी राबविलेल्या गड-अभ्यास मोहिमेने झाली. या अभ्यासादरम्यान गडाच्या उत्तरेकडील बुरुजापासून सुमारे ५५० मीटर अंतरावर पहिली, तर त्यापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर दुसरी अशा दोन ऐतिहासिक तोफा आढळून आल्या. इतिहासाचा हा सुवर्णकाळ डोळ्यांसमोर आणणारा ठेवा जतन करण्यासाठी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून शनिवारी (ता. 20) प्रत्यक्ष संवर्धन मोहिमेला सुरुवात झाली. मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सायंकाळी ९ वाजेपर्यंत पहिली तोफ गडावर आणण्यात यश आले. मात्र, दुसरी तोफ अतिशय खोल आणि दुर्गम दरीत असल्याने तिला वर काढणे एक मोठे आव्हान होते.
या दोन्ही तोफांचे वजन प्रत्येकी अंदाजे ३५० ते ४०० किलोग्रॅम होते. या अवजड तोफेच्या स्थलांतरासाठी प्रतिष्ठानने सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या प्रशिक्षित बचाव पथकाची मदत घेतली. पथकाने आधुनिक 'टेक्निकल रोप रेस्क्यू' प्रणाली, अचूक अँकरिंग आणि योग्य भारवाटप पद्धतीचा वापर करून अत्यंत नियोजनबद्ध रितीने ही तोफ दरीतून बाहेर काढली.
या मोहिमेविषयी बोलताना बचाव पथकाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, ही मोहीम आमच्यासाठी एका सराव शिबिरासारखीच ठरली. यापूर्वी आम्ही खोल दऱ्या किंवा नदीपात्रातून जिवंत व्यक्ती अथवा मृतदेह बाहेर काढण्याचे काम केले आहे, जिथे वजन १५० किलोपेक्षा कमी असायचे. मात्र, अर्धा टनाच्या जवळपास वजन असलेल्या या ऐतिहासिक वस्तूची रिकव्हरी करणे हा एक नवा आणि मौल्यवान अनुभव होता. भविष्यात नैसर्गिक आपत्ती, दरड कोसळणे किंवा अवजड वाहन अपघाताच्या प्रसंगी या कौशल्याचा मोठा फायदा होईल. या यशस्वी आणि जोखमीच्या मोहिमेमुळे अवचितगडाचा ऐतिहासिक वारसा तर सुरक्षित झालाच, पण सोबतच बचाव पथकाच्या कौशल्याचीही यशस्वी चाचणी झाली. या ऐतिहासिक कार्याबद्दल संपूर्ण परिसरातून आणि इतिहासप्रेमींकडून दोन्ही संस्थांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.