राज्यातल्या देवस्थानांच्या जमिनी लाटण्याचा भूमाफियांनी जोरदार सपाटा लावलाय. होय तुम्ही बरोबर ऐकलत... अकोल्याच्या तेल्हारात श्री बालाजी मंदिर संस्थानच्या मालकीची 30 कोटींची जमीन विश्वस्तांनी हडपल्याचा धक्कादायक आरोप ग्रामस्थांनी केलाय...विशेष म्हणजे 30 कोटी रुपयांची जमीन अवघ्या 10 हजार रुपयात विश्वस्तांच्या घशात घातल्याचा आरोप होतोय. देवाच्या जमिनीचा मलिदा लाटण्यासाठी कोणी-कोणी अभद्र युती केली याचा पर्दाफाश करण्यासाठी साम टीव्हीची इन्व्हेस्टिगेशन टीम थेट तेल्हारात जाऊन पोहचली....तेव्हा काय समोर आलं ते पाहूयात..
अकोल्यातील तेल्हारामध्य़े शेत गट क्र. 5, ही साडेचार एकर क्षेत्रफळ असणारी श्री बालाजी संस्थानच्या मालकीची शेत जमीन आहे..या शेतजमिनीच्या रेकॉर्ड ऑफ राईट आणि 7/12मध्ये संस्थानच्या नावाची नोंद आहे.. तसचं याआधी 29/04/1957 च्या आदेशानुसार ही जमीन पूर्वी मध्यप्रदेश पब्लीक ट्रस्ट अँक्ट अंतर्गत नोंदणीकृत आहे..संस्थानाची नोंदणी करताना रंगलाल दायमा, धनसुखदार गोवर्धनदासजी आणि सुंदरलाल प्रयागदास हे विश्वस्त होते..या विश्वस्तांच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या कुटुंबातील व्यक्ती विश्वस्त झाले..मात्र रंगलाल दायमा यांच्या कुटुंबातील सदस्यांची संस्थानमध्ये वेळोवेळी विश्वस्त म्हणून निवड करण्यात आली...दरम्यान सुरेश दायमा, कांताप्रसाद दायमा आणि हेमंत दायमा यांनी मंदिर संस्थानाची जमीन आपल्या नावे करून घेतली.. 30 कोटींची जमीन अवघ्या 10 हजार रुपयांत सुरेश दायमा यांनी स्वत:सह कुटुंबीयांच्या नावे केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय...
त्यामुळे या प्रकरणाचं सत्य जाणून घेण्यासाठी सामच्या इन्व्हेस्टीगेशन टीमनं तक्रारदारांना गाठलं...यावेळी तक्रारदारांनी धक्कादायक माहिती दिलीय... दायमा यांनी जमीन नावावर करून घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आणि महसूल विभागातील तत्कालीन अधिकाऱ्यांच्या संगनमताने कथित घोटाळा केल्याचा आरोपही तक्रारदारांनी केलाय...
या प्रकरणात देवसंस्थांनाचे भक्त कैलास रत्नपारखी, दयाराम विरघट, मनोहर मिरगे, सेवकराम भारसाकळे, सुधाकर गावंडे, श्रीराम अस्वार यांच्याकडून न्यायालयीन लढा सुरु आहे... या भूखंड घोटाळ्याची दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी जमीन लाटल्याचे आरोप झालेल्या सुरेश दायमा यांच्याशी साम टिव्हीनं संपर्क साधला... त्यांनी कुळ कायद्यांतर्गत जमीन नावावर केल्याचा दावा केलाय.
दुसरीकडे कलम 57 अंतर्गत अकोटच्या तत्कालीन उपविभागीय अधिकाऱ्यांकडून दायमा कुटूंबीयांना शेतजमीन विक्री परवानगी देण्यात आल्याची माहितीही साम इन्व्हेस्टीगेशनमध्ये समोर आली.. त्यानंतर तथ्य जाणून घेण्यासाठी 'साम'नं तेल्हारा तहसीलदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
राज्यात देवस्थांनांच्या कोट्यवधींच्या जमिनी विश्वस्त, बिल्डर आणि अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीनं कवडी मोल भावात घशात घातल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे या जमिनींबाबत कठोर धोरण राबवण्याची गरज आहे. अन्यथा हक्काच्या जमिनीवरच देव आणि देवस्थान अनाथ व्हायला वेळ लागणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.