अकोला - संपूर्ण भारतात 'रावणा'च्या पुतळ्याला दसऱ्याला दहन केले जाते, मात्र अकोला जिल्ह्यातील सांगोळा या गावात गेल्या अडीचशे वर्षांपासून रावणाची दगडाची मूर्ती असल्याचे सांगितले जाते. या गावातील सर्व जाती धर्माचे लोक या मूर्तीची नियमित पूजा करतात. दसऱ्याला देशात रावणाचे दहन केले जाते त्यावेळी गावात मात्र रावणाची मोठ्या उत्साहात पूजा केली जाते. (Tajya Batmya)
विजयादशमी (Dussehra) म्हणजे सत्याचा असत्यावर विजय. रामराज्याचा रावणराज्यावरचा विजय. प्रभू रामाने रावणचा शेवट केला तो दिव्य दिवस म्हणून संपूर्ण भारतभर विजयादशमीला रावणरूपी पुतळ्याचं दहन होतं. रावण म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यांसमोर येते तो रावण नावाचा खलनायक. लहानपणापासून रावणाच्या दुष्कृत्यांचे किस्से रामायणापासून ते अनेक पोथ्यापुराणांतून आपण ऐकलेले, वाचलेले असतात. (Akola Latest News In Marathi)
त्यामुळे रावण म्हटलं की तो खलनायक, दुष्ट, राक्षस म्हणूनच आपल्याला माहीत असतो. पण अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्याच्या सांगोळा या गावात चार ते साडेचार फूट उंच काळ्या दगडातील रावणाची मूर्ती ही कुणाही सामान्य माणसाला आश्चर्यचकित करते. रामराज्यात रावण पूजन ही गोष्टच अनेकांना विचार करायला भाग पाडते.
सांगोळा हे हजार-दीड हजार लोकवस्तीचं गाव. रावणाच्या मूर्तीने मात्र हे गाव रावणाचं सांगोळा असंच काहीसं ओळखलं जातं. सुमारे २०० ते २५० वर्षांहून अधिकचा इतिहास या सांगोळ्याच्या रावणपूजेला असल्याचं गावकरी सांगतात. रावणाची मूर्ती ही या गावात कशी आली याबाबत गावकरी आख्यायिका सांगतात.
गावातील ग्रामदैवतेसमोरील झाडाची दगडी प्रतिकृती बनवण्याकरिता गावातील काही प्रतिष्ठित नागरिकांनी पंचक्रोशीतील बाभुळगावच्या एका शिल्पकाराला सांगण्यात आले. त्या मुर्तीकाराने मूर्ती घडवली पण ती झाडाची न बनता दहा तोंडांची अहंकारी पुरुषाची प्रतिकृती निर्माण झाली. सांगितल्याप्रमाणे मूर्ती मिळाली नसल्याने गावकरीदेखील विचारात पडले. पण मूर्ती तयार आहे तर न्यावी लागणार म्हणून मूर्ती न्यायचं ठरवलं आणि गावात गेल्यावर काय तो निर्णय घेऊ म्हणून निघाले असता प्रत्येक गावाची हद्द आली का मूर्ती असलेली बैलगाडी अडून राहायची. हलायचीच नाही.
शेवटी गावकऱ्यांनी प्रत्येक गावाच्या वेशीवर नारळ फोडून गावात मूर्तीची स्थापना करू असे कबूल केले असता पुढे अडथळे आले नाहीत. अशी आख्यायिका सांगितली जाते. अशा रीतीने मूर्ती गावात आली. सांगोळ्यातील रावण मूर्तीची अशी आख्यायिका आहे. सांगोळ्यात या मूर्तीविषयी किंवा रावणाविषयी तिटकारा, तिरस्कार वाटत नाही. की कधी विरोध म्हणून कुणीच रावणाच्या मूर्तीची टिंगल किंवा विटंबनादेखील केली नाही.
इतर ठिकाणी मात्र रावणाची दसऱ्याला टिंगल व चेष्टा होतानाच जास्त दिसते. गावात रावणाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा कुठलाही मोठा उत्सव होत नसला तरी गावातील नागरिक आपापल्या सोयीनुसार पूजा करतात. शत्रूलाही मित्र समजणारी ही आपली संस्कृती सांगोळा वासियांनी यातून अधीरेखित केलं आहे. त्यामुळेच रामराज्यात रावण पूजन ही गोष्टच अनेकांना विचार करायला भाग पाडते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.