- अमर घटारे / बालाजी सुरवसे
Crime News : पोलीस असल्याचे बतावणी करुन नागरिकांना फसविण्याच्या दाेन घटना राज्यात घडल्या. एका घटनेत 71 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. एका घटनेतील संशयितांना पाेलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चाैकशी सुरु आहे. (Maharashtra News)
धाराशिवला वृद्धाला लुटले
धाराशिव शहरात पोलीस असल्याचे बतावणी करून गणेश नगर भागातील राजकुमार बाबुराव पवार या वृद्ध व्यक्तीची तब्बल 71 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
दरम्यान पवार हे शहरातील सर्विस रोडवर असताना दोन व्यक्तीनी आम्ही पोलीस असल्याची बतावणी केली तसेच पवार यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे लॉकेट व रोख रक्कम 16,500 असा एकुण 71 हजार 500 रुपयांची फसवणूक करत हा मुद्देमाल घेवुन गेले. या प्रकरणी धाराशिव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस संशयिताचा शोध घेत आहेत.
दर्यापुरात चाैघे ताब्यात
अमरावती जिल्ह्यात पोलीस असल्याची बतावणी करून आयुर्वेदीक औषधचा व्यवसाय करणाऱ्या दुकानदाराकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणा-या चाैघांना दर्यापुर पोलीसांनी ताब्यात घेतले.
फिर्यादी राज बाबाराव सोळंकी (रा.कोढाळी) यांचे दर्यापुर येथील डायमंड व्यापारी संकुलात आयुर्वेदीक औषधी विक्रीचे दुकान आहे. या प्रकरणातील चार संशयितांनी आम्ही पोलीस असून तुम्ही नकली औषधी विकत असल्याची आमचेकडे तक्रार आहे असे सागून सोळंकी यांना पैश्यांची मागणी केली.
या प्रकाराने राज हे घाबरून गेले. मात्र काही वेळाने त्यांना शंका आल्याने त्यांनी आजुबाजुच्या दुकानदारांना बोलावून घेतले. या व्यक्ती बनावट पाेलीस असल्याचे लक्षात आल्याने त्यांनी दर्यापुर पोलीसांना याविषयी माहिती दिली.
पोलीसांनी राज यांच्या तक्रारीनूसार नितीन राजु तायडे (रा.सहयोग काॅलनी अमरावती), गजानन सोनकुसरे (रा.एम.आय.डी.सी, अमरावती), रूपेश मस्के (रा.हमालपुरा अमरावती) व सादिक शहा महबुब शहा यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चाैकशी सुरु आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.