महाराष्ट्र विधानसभेच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) २८८ जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. आज सकाळी ७ वाजल्यापासून सर्वत्र मतदानाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ठाण्यातील मतदान केंद्रावर सहकुटुंबासोबत मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र, खासदार श्रीकांत शिंदेही (Shrikant Shinde) उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना मतदान करण्याचा संदेश देखील दिला.
ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उमेदवार आहेत. ते उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार केदार दिघे यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या पत्नी लता शिंदे, वडील संभाजी शिंदे, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि सून वृषाली शिंदे यांनी देखील आज ठाण्यातील मतदान केंद्रावर मतदान केले.
मतदान केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज दिवस हा लोकशाहीच्या उत्सवाचा चांगला दिवस आहे. महाराष्ट्राला उज्वल व शक्तीशाली करणारा हा उत्सवाचा दिवस आहे आणि देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारा हा उत्सव आहे. सर्व मतदारांनी या उत्सवात सहभागी व्हायला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे. कारण मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य आहे ही आपली जबाबदारी आहे आणि म्हणून ती प्रत्येक नागरिकांनी पार पाडली पाहिजे. या लोकशाहीच्या उत्सवात सामील झालं पहिजे ही माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे. मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढवण्यासाठी प्रत्येकाने मतदान करावं आणि लोकशाही समृद्ध करावी अशा प्रकारची विनंती मी करतो. गेल्या पाच वर्षाचा कारभार आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिला आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.
२०१९ ला मतदान झालं आणि त्यावेळी जे काही महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षेच्या विरुद्ध झालं सरकार चुकीच्या पद्धतीने तयार झालं. ही जनता २०१९ ची घटना अजूनही विसरलेली नाही. ज्यावेळी गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याची कोणी दशा केली आणि या राज्याला विकासाची दिशा कोणी दाखवली हे लोकांना माहीत आहे. कल्याणकारी योजना व विकास लोकांना माहीत आहे.अनेक योजना सर्व सामान्यांसाठी आम्ही केल्या. आम्हांला समाधान आहे. या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी महायुतीने प्रयत्न केला आणि मला वाटतं या राज्याची जनता समाधानी आहे. जनता भरभरून आम्हाला विकासाला मतदान करतील. मतदान लोकशाहीला मजबूत करणार आहे. येणारं सरकार महायुतीच व बहुमताचं असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.