मविआचं जागा वाटपाचं घोडं अडलेलं असताना घटक पक्षांची नाराजी नेत्यांची डोकेदुखी ठरणार आहे. शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. शेकापचा बालेकिल्ला असलेल्या सांगोला मतदारसंघावरुन हा वाद निर्माण झाला आहे. शेकाप 8 जागांवर स्वतंत्र उमेदवार जाहीर करणार असल्याची शक्यता आहे.
सांगोला,कंधार, उरण,पनवेल, आलिबाग यासह 8 जागांवर उमेदवार जाहीर करणार असल्याची सूत्रांनी माहिती दिलीये. सांगोल्याच्या शेकापच्या जागेवर ठाकरे गटाने दावा केल्याने वाद निर्माण झालाय. शेकाप नेते बाबासाहेब देशमुख सांगोल्यातून लढण्यास इच्छुक आहेत. देशमुखांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. दरम्यान सांगोलामध्ये शरद पवार बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा देतील, असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय.
अजित पवार गटातील दीपक साळुंखे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. साळुंखे यांना सांगोल्यातून उमेदवारी देण्याच्या तयारीत ठाकरे गट आहे. दिवंगत आमदार आबासाहेब देशमुख यांनी गेले 60 वर्ष सांगोला तालुक्याचे नेतृत्व केले. या तालुक्यात पुरोगामी विचार टिकवण्यासाठी गणपतराव देशमुख यांनी अहोरात्र कष्ट घेतले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने सांगोल्याची जागा ही शेकापला सोडावी, अशी बाबासाहेब देशमुख यांची भूमिका आहे.
2019 मध्ये गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुख आणि शहाजी पाटलांमध्ये काँटे की टक्कर झाली होती. त्यामध्ये शहाजी पाटलांचा काठावर विजय झाला. 2019 मध्ये नेमकं काय चित्र होतं? पाहूयात.
१) शहाजी पाटील - शिवसेना 99 हजार 464
२) डॉ. अनिकेत देशमुख - शेकाप 98 हजार 696
३) राजेश्री नागणे - अपक्ष 3 हजार 162
ठाकरे गटानं आपला हट्ट सोडला नाही तर सांगोल्यात बंडखोरी अटळ आहे. तिहेरी लढत झाल्यास शहाजी पाटील बाजी मारणार की शेकाप गड राखणार? याची उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.