छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभेची निवडणूक अनेक वर्ष सोबत राहिलेल्या दोन शिवसैनिकांमध्ये आहे. चंद्रकांत खैरे आणि संदीपान भुमरे रिंगणात आहेत. प्रतिज्ञापत्रातील बदलामुळे भुमरेंवर विरोधकांनी हल्लाबोल केलाय. नेमकं काय प्रकरण आहे पाहूया या खास रिपोर्टमधून...
लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरचे शिवसेनेचे उमेदवार आणि मंत्री संदिपान भुमरे यांनी दोनच दिवसांत प्रतिज्ञापत्रात बदल केल्याचं पाहायला मिळालं. आधी म्हणाले बायको शेती करते, आता म्हणतात पत्नीच्या नावावर दारू विक्रीचे 2 परवाने आहेत. दोनच दिवसात भुमरेंनी प्रतिज्ञापत्रात केलेला बदल चर्चेचा विषय ठरलाय.
22 एप्रिल रोजी त्यांनी दाखल केलेल्या पहिल्या अर्जाच्या प्रतिज्ञापत्रात पत्नीचा व्यवसाय शेती आणि घरकाम दाखवला होता, तर 24 एप्रिल रोजी त्यांनी दाखल केलेल्या दुसऱ्या अर्जासोबत प्रतिज्ञापत्रात पत्नीचा व्यवसाय शेती आणि मद्यविक्री परवाने असा दाखवण्यात आला. दोनच दिवसात प्रतिज्ञापत्रात बदल केल्याने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. संदीपान भुमरे यांनी प्रतिज्ञापत्रात दारू दुकानांची माहिती का दडवली? असा सवाल विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता. त्यावर आम्ही कोणता व्यवसाय करायचा ते आम्ही ठरवू पण तुम्ही वीस वर्षात काय केलं त्याचं उत्तर द्या असं प्रत्युत्तर भुमरेंनी दिलंय.
भुमरेंनी पहिल्या अर्जात स्वतःच्या उत्पन्नाचा स्रोत शेती, पत्नीच्या उत्पन्नाचा स्रोत शेती आणि घरकाम दाखवला होता. याबाबत विरोधकांनी टीका केल्यावर 24 एप्रिलला दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात पत्नी पुष्पा भुमरे यांचा उत्पन्नाचा स्रोत शेती आणि मद्यविक्री परवाने, तर स्वतःच्या उत्पन्नाचा स्रोत शेती, मानधन आणि भाडे दाखवण्यात आलंय. 2020 मध्ये पत्नीचं उत्पन्न शून्य रूपये होते ते 2023 मध्ये 14.86 लाख झालंय. रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांची संपत्ती मंत्रिपदाच्या काळात तब्बल अडीचपटीने वाढली आहे.
आता या बदललेल्या प्रतिज्ञापत्रावरून चर्चा तर सुरू झाली आहे. मतदारांसमोर स्वच्छ प्रतिमा ठेवण्याच्या नादात भुमरेंनी आपली दारूची दुकानं तर लपवली नाहीत ना? अशी कुजबूज इथल्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.