Jammu And Kashmir News:
एक मोठी बातमी समोर येत आहे. जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील मेंढर येथे रविवारी एका निवडणूक सभेत अज्ञात व्यक्तींनी केलेल्या चाकू हल्ल्यात नॅशनल कॉन्फरन्सचे तीन कार्यकर्ते जखमी झाले. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला हे मेंढर येथे अनंतनाग-राजौरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मियां अल्ताफ यांच्या समर्थनार्थ पक्षाने आयोजित केलेल्या सभेत उपस्थित होते. सभा सुरू असताना ही घटना घडली असल्याचं सांगण्यात येत आहे.
सभेदरम्यान काही कारणावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. हाणामारीचा फायदा घेत हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनेच्या संदर्भात गुन्हा दाखल केला असून दोषींना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. अधिक माहिती देताना पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोहेल अहमद, यासिर अहमद (हर्णी येथील रहिवासी ) आणि मोहम्मद इम्रान (कसबलारी गावातील रहिवासी) यांना चाकूहल्लात दुखापत झाली असून त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, सोहेल आणि यासिर यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारांसाठी राजौरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. एनसीचे वरिष्ठ नेते जावेद अहमद राणा यांनी या घटनेला सुरक्षा त्रुटी म्हणत दोषींना त्वरित अटक करण्याची मागणी केली आहे. चाकू घेऊन लोक सभेच्या ठिकाणी घुसण्यात यशस्वी झाले, हे खूप गंभीर असल्याचं ते म्हणाले आहेत. दरम्यान, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.