लिव्हर म्हणजेच यकृत हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. शरीरातील अनेक आवश्यक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी लिव्हरची भूमिका महत्त्वाची असते. मात्र सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीचा आहार, सततचा ताण, अपुरी झोप आणि शरीरात पाण्याची कमतरता याचा परिणाम लिव्हरच्या आरोग्यावरही होऊ शकतो. त्यामुळे फॅटी लिव्हरसह लिव्हरशी संबंधित इतर समस्या निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो.
लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी रोजच्या जीवनशैलीत काही साधे बदल करणं महत्त्वाचं आहे. डॉक्टर बिमल छाजेर यांनी लिव्हरच्या आरोग्यासाठी घरच्या घरी सहज तयार करता येतील अशा दोन ड्रिंक्सबाबत माहिती दिलीये.
लिव्हरच्या आरोग्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी कोमट लिंबूपाणी घेण्याचा पर्याय उपयुक्त ठरू शकतो. लिंबूपाणी शरीरातील नैसर्गिक स्वच्छतेच्या प्रक्रियेला मदत करू शकते. तसंच पचनक्रिया सुरळीत होण्यास आणि पोट फुगण्याची समस्या कमी होण्यासही मदत मिळू शकते. सकाळी लिंबूपाणी घेतल्याने शरीराला ताजेतवाने वाटण्यासोबतच दिवसभरासाठी ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते.
डॉ. बिमल छाजेर यांच्या मते, चुकीचा आहार, जास्त ताण, पुरेशी झोप न घेणं आणि शरीरात पाण्याची कमतरता या सवयी लिव्हरच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. त्यामुळे लिव्हर निरोगी ठेवायची असेल तर आहारासोबतच जीवनशैलीकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.
लिव्हरच्या आरोग्यासाठी दुसरा पर्याय म्हणजे बीट आणि गाजराचा ज्यूस. बीट आणि गाजर या दोन्हीमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेली अनेक जीवनसत्त्वं आणि पोषक घटक असतात. बीटमध्ये बीटेन नावाचा घटक आढळतो. तर गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन असतं. हे घटक शरीरासाठी उपयुक्त मानले जातात. चुकंदर आणि गाजराचा ज्यूस लिव्हरच्या पेशींना होणारी झीज भरून काढण्याच्या प्रक्रियेला मदत करू शकतो. तसंच रक्त शुद्ध ठेवण्यास आणि शरीराची नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रिया सुरळीत ठेवण्यासही तो मदत करू शकतो.
लिव्हरची काळजी घेण्यासाठी केवळ एखादं ड्रिंक घेणं पुरेसं नाही. रोजच्या आहारात आणि जीवनशैलीतही काही चांगल्या सवयी लावणं गरजेचं आहे.
आहारात सफरचंद, पपई आणि संत्री यांसारख्या फळांचा समावेश करा.
पालक, मेथी, कोथिंबीर यांसारख्या हिरव्या पालेभाज्या नियमित खा.
जेवणाच्या वेळेत खूप मोठे अंतर ठेवू नका. शक्यतो नियमित वेळेवर जेवण करा.
दिवसभर पुरेसं पाणी प्या आणि शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका.
दररोज पुरेशी झोप घ्या.
चालणं, योगासनं किंवा इतर हलका नियमित व्यायाम करण्याची सवय लावा.
लिव्हरला नुकसान पोहोचवणाऱ्या सवयी टाळा
लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी चांगल्या सवयी अंगीकारण्यासोबतच लिव्हरला नुकसान पोहोचवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहणेही तितकंच महत्त्वाचं आहे. मद्यपान आणि धूम्रपान टाळणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गरज नसताना औषधं घेणं टाळा. काही औषधांचा जास्त प्रमाणात किंवा अनावश्यक वापर केल्यास त्याचा लिव्हरवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे लिव्हरच्या आरोग्यासाठी फक्त एखाद्या ड्रिंकवर अवलंबून न राहता योग्य आहार, पुरेसं पाणी, नियमित व्यायाम, चांगली झोप आणि निरोगी जीवनशैली यांचा अवलंब करणं महत्त्वाचं आहे.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.