रिप्लाय देत नसल्यास अनेक प्रश्न मनात निर्माण होतात.
मेसेजच्या उत्तराची प्रतीक्षा करताना अनेकजण वारंवार मोबाईल तपासतात.
नातेसंबंधांमध्ये गैरसमज निर्माण करू शकतात.
मोबाईल फोन द्वारे आपण दूरवर असलेल्या आपल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. त्यांची विचारपूस करायची असेल किंवा आपल्या मनातील भावना व्यक्त करायच्या असतील, तर मोबाईल फोनवर एक छोटासा मेसेज पाठवून त्याची माहिती घेत असतो. मात्र, कधीकधी हेच मेसेज नातेसंबंधांत अस्वस्थतेचे कारणही ठरू शकतात. जर तुम्ही कोणाला मेसेज पाठवला आणि बराच वेळ उलटूनही त्याचे उत्तर आले नाही, तर तुम्ही वारंवार आपला फोन तपासू लागतात.
मनात प्रश्न निर्माण होऊ लागतात की, समोरची व्यक्ती ऑनलाइन होती, मग तिने उत्तर का दिले नाही? ती माझ्यावर नाराज आहे का, की तिला आता माझ्याशी बोलायची इच्छाच उरलेली नाही? अशी प्रश्न अनेकदा मनात येत असतात. मानसशास्त्रामध्ये, या प्रकारची प्रतिक्रिया समजून घेण्यासाठी 'अटॅचमेंट स्टाईल', 'रिजेक्शन सेन्सिटिव्हिटी' आणि 'नात्यांमधील भावनिक सुरक्षितता' यांसारख्या संज्ञा वापरल्या जातात. पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की, एखाद्याकडून थोड्याशा उत्तराची वाट पाहिल्याने आपल्याला इतकी अस्वस्थता का वाटते? नाही ना मग चला यामागील मानसशास्त्र काय ते जाणून घेऊ.
जेव्हा आपण कोणाच्या तरी जवळ असतो, तेव्हा आपण स्वाभाविकपणे तशाच प्रकारच्या जवळीकतेची अपेक्षा करत असतो. समोरच्या व्यक्तीकडून वेळेवर प्रतिसाद मिळाल्यास आपल्याला असे वाटते की त्यांच्या आयुष्यात आपले काहीतरी महत्त्व आहे. तर रिप्लाय येण्यास झाल्यास नात्याबद्दल असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. विशेषतः जेव्हा आपण आधीच अस्वस्थ असतो किंवा नात्यातील विविध गैरसमजांशी संघर्ष करत असतो.
नातेसंबंधांच्या मानसशास्त्रात, आसक्तीच्या शैलींना महत्त्वपूर्ण स्थान आहे. काही व्यक्ती नातेसंबंधांमधील भावनिक सुरक्षिततेच्या बाबतीत अधिक संवेदनशील असतात. याला चिंताग्रस्त आसक्ती म्हणून ओळखले जाते. अशा व्यक्तींना आपल्या जोडीदाराकडून कमी मेसेज मिळणे किंवा उत्तरास विलंब होणे, ही गोष्ट विशेषतः त्रासदायक वाटू शकते. समोरची व्यक्ती आपल्यापासून दूर जात आहे का, असा विचार त्यांच्या मनात वारंवार येऊ शकतो.
या विषयावरील एक संशोधन अभ्यास २०२२ मध्ये 'सायबरसायकॉलॉजी, बिहेवियर, अँड सोशल नेटवर्किंग' (Cyberpsychology, Behavior, and Social Networking) या नियतकालिकात प्रकाशित झाला होता. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ फ्लोरिडाच्या संशोधकांनी, रोमँटिक संबंधांत असलेल्या ३०२ तरुण-तरुणींच्या मेसेज पाठवण्याशी संबंधित वर्तनाचा अभ्यास केला.
संशोधनातून असे दिसून आले आहे की, 'अँक्झायस अटॅचमेंट' शैली असलेल्या व्यक्ती ज्यांच्यामध्ये अति-चिंता करण्याची प्रवृत्ती असते. त्या आपल्या जोडीदाराच्या तुलनेत अधिक मेसेज पाठवणे पसंत करतात. अशा व्यक्तींसाठी केवळ संवाद साधणे पुरेसे नसते. उलट मेसेजची संख्या हे त्यांच्यासाठी नातेसंबंधातील समाधानाचे एक निदर्शक ठरत असते. कधीकधी, नातेसंबंधातील सखोलता किंवा गुणवत्तेपेक्षाही मेसेजची ही संख्या त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाची ठरते.
जेव्हा आपल्याला रिप्लाय मिळत नाही, तेव्हा आपले मन स्वतःच्याच स्टोरी बनवू लागते. चॅटिंग करतेवेळी सर्वात मोठे आव्हान हे असते की, आपण समोरच्या व्यक्तीचा चेहरा पाहू शकत नाही, त्यांचा आवाज ऐकू शकत नाही किंवा त्यांच्या हावभावांचे निरीक्षण करू शकत नाही. परिणामी जेव्हा ती व्यक्ती त्वरित उत्तर देत नाही, तेव्हा आपले मन त्या परिस्थितीचा अर्थ आपापल्या परीने लावू लागते.
उदाहरणार्थ, समोरची व्यक्ती कदाचित एखाद्या महत्त्वाच्या कामात व्यस्त असू शकते, पण आपण मात्र असा विचार करू लागतो की, "त्यांना माझ्याशी अजिबात बोलायचे नाहीये" किंवा "ते मुद्दाम मला दुर्लक्षित करत आहेत." हा संभ्रम आणि अनिश्चितता आपल्या मनात अस्वस्थता निर्माण करू लागतात. जर नात्यात आधीच काही मतभेद किंवा तणाव असेल, तर ही अस्वस्थता अधिकच तीव्र होत असते. जर एखादी व्यक्ती जी आधी तुम्हाला त्वरित रिप्लाय देत असायची ती अचानक रिप्लाय द्यायला जास्त वेळ घेऊ लागली, तर तुमचे मन उदास होणे स्वाभाविकच आहे. अशा बदलामुळे मनात त्वरित अस्वस्थतेची भावना निर्माण होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.