आजच्या धकाधकीच्या जिवनात फूड ट्रेंड्स सोशल मीडियावर जितक्या झपाट्याने येतात, तितक्याच वेगाने पुन्हा पुन्हा व्हायरलही होतात. सध्या असा एक अनोखा आणि थोडासा हटके फूड ट्रेंड पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचं नाव म्हणजे ‘गर्ल डिनर’. टिकटॉकवर २०२३ मध्ये झपाट्याने पसरलेला हा ट्रेंड २०२५ मध्ये पुन्हा एकदा लोकांच्या जेवणाच्या सवयींमध्ये जागा मिळवत आहे.
गर्ल डिनर ही कोणतीही पारंपरिक रेसिपी नाही. ही एक सवय, एक आरामदायी पद्धत आहे. स्वतःसाठी बनवलेली आणि पूर्णतः आपल्या आवडीनुसार सजवलेली एक प्लेट. यात कोणताही ठरावीक मेनू नसतो. काहीवेळा फ्रिजमध्ये उरलेले पदार्थ, काही चविष्ट स्नॅक्स, फळं, ब्रेड, चीज, ड्रायफ्रूट्स, थोडेसे वाईन किंवा सोडा जे जे तुमचं मन म्हणेल ते. हे सगळं एकत्र करून एक रंगीबेरंगी प्लेट तयार होते. ज्यात सौंदर्यशास्त्र, समाधान आणि थोडासा आराम यांचा सुरेख मिलाफ असतो.
हा ट्रेंड सगळ्यात आधी टिकटॉकवर डिजिटल क्रिएटर ऑलिव्हिया माहेर यांनी सुरू केला होता. त्यांच्या एका साध्यासोप्या व्हिडिओमध्ये ब्रेड, चीज, द्राक्षं आणि वाईनसोबतचा डिनर दाखवण्यात आला होता. त्यांच्या या डिनर आयडियाने लाखो लोकांना आकर्षित केलं आणि ‘गर्ल डिनर’ म्हणून हा फॉरमॅट व्हायरल झाला.
२०२५ मध्ये ही संकल्पना पुन्हा व्हायरल होण्यामागे अनेक कारणं आहेत. सध्याच्या जीवनशैलीमध्ये वेळेचा अभाव, सततचा थकवा आणि जलद काहीतरी खाण्याची गरज यामुळे लोक हलकेफुलके पण समाधानकारक अन्न पसंत करत आहेत. गर्ल डिनर ही अचूक याचं उत्तर आहे. फक्त तुमचं आवडतं काहीतरी प्लेटमध्ये ठेवा आणि ते खाण्याचा आनंद घ्या – स्वयंपाक नाही, वाफा नाही, वेळ नाही.
तरुणी आणि महिलांना हा ट्रेंड विशेषतः आवडतोय कारण तो केवळ खाण्याबाबतच नाही, तर आत्म-प्रेम आणि सेल्फ केअरचा एक भाग बनतो आहे. स्वयंपाक करण्याची गरज न पडता स्वतःसाठी काहीतरी खास बनवण्याचा हा एक सुखद अनुभव ठरतो आहे. अनेक महिलांसाठी तो एक प्रकारचा ‘मी टाइम’ सुद्धा आहे. स्वतःसाठी वेळ, स्वतःसाठी जेवण आणि स्वतःसाठी आनंद.
तथापि, गर्ल डिनर ट्रेंडचे काही तोटेही आहेत. जसे की सतत फक्त स्नॅक्स, प्रक्रिया केलेले पदार्थ, आणि पोषणमूल्य नसलेले अन्न घेतल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. म्हणूनच हा ट्रेंड आरामासाठी, मानसिक विश्रांतीसाठी किंवा अधूनमधून केल्यास उपयुक्त आहे. मात्र तो दररोजची सवय न बनवणं चांगलं.
गर्ल डिनर म्हणजे केवळ अन्न नाही, तर एक भावना आहे. 'फक्त स्वतःसाठी'. त्यामुळे २०२५ मध्ये जेव्हा वेळ कमी आहे, मन थकलेलं आहे आणि शरीराला गरज आहे हलक्या पण खास जेवणाची – तेव्हा गर्ल डिनर हा ट्रेंड एकदम परफेक्ट ठरतो. शेवटी, काही वेळा आपल्या जेवणाच्या टेबलावर जास्त पदार्थांची नाही, तर आपल्या आवडत्या गोष्टींच्या थोड्याशा भागांचीही गरज असते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.