अनेकांना सुपारी, पान किंवा गुटखा खाण्याची सवय असते. अनेक जण ही सवय फारशी गंभीर मानत नाहीत. पण या सवयींमुळे तोंडाच्या आतील भागाचं हळूहळू नुकसान होऊ शकतं. सुरुवातीला तोंडात जळजळ होणं, पांढरे किंवा लाल डाग दिसणं आणि तोंड उघडताना त्रास होणं अशी लक्षणं दिसू शकतात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास तोंडाच्या कॅन्सरता धोका वाढू शकतो. त्यामुळे तोंडात असे बदल दिसल्यास वेळीच डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं गरजेचं आहे.
मुंबईतील एसएसओ कॅन्सर हॉस्पिटलमधील हेड अँड नेक कॅन्सर सर्जन डॉ. अमित चक्रवर्ती यांनी सांगितलं की, तंबाखू खाल्ल्यानेच तोंडाच्या कॅन्सरचा धोका वाढतो. केवळ सुपारी खाणंही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. नियमित सुपारी चघळल्याने तोंडाच्या आतील नाजूक त्वचेला त्रास होतो. त्यामुळे तोंडातील पेशींमध्ये चुकीचे बदल होऊ शकतात. सुपारीसोबत तंबाखू खाण्याची सवय असल्यास हा धोका आणखी वाढतो. कारण तंबाखूमध्ये कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरणारी अनेक रसायनं असतात. त्यामुळे सुपारी, पान आणि गुटखा खाण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
तोंडात जखम किंवा गाठ दिसत नाही, म्हणजे कोणताही गंभीर आजार नाही, असा अनेकांचा समज असतो. मात्र हा समज चुकीचा ठरू शकतो. सुपारी, पान किंवा गुटखा सतत खाल्ल्यामुळे तोंडाच्या आतील त्वचेत सुरुवातीला सहज लक्षात न येणारे बदल होऊ शकतात.
काही वेळा हे बदल कॅन्सरची स्पष्ट लक्षणं दिसण्यापूर्वीच सुरू झालेले असतात. अशा बदलांमुळे भविष्यात कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो. कॅन्सर होण्यापूर्वी शरीरात दिसणाऱ्या अशा बदलांना कॅन्सरपूर्व अवस्था अस म्हणतात. त्यामुळे तोंडात कोणताही असामान्य बदल दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
सुपारी खाण्याच्या सवयीमुळे होणारा एक महत्त्वाचा विकार म्हणजे ओरल सबम्युकस फायब्रोसिस. या विकारात गालाच्या आतील भागातील ऊती हळूहळू कडक होतात. त्यामुळे त्या भागाची लवचिकता कमी होते आणि तिथे तंतूसारखे कडक पट्टे तयार होऊ लागतात. सुरुवातीला तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर तोंडात जळजळ होणं, गालांच्या आतील भागात ताण जाणवणे किंवा तोंड पूर्ण उघडता न येणं अशी लक्षणं दिसतात. पुढे हा त्रास वाढू शकतो आणि तोंड उघडण्याची क्षमता आणखी कमी होऊ शकते.
त्यामुळे तोंड उघडताना त्रास होत असल्यास किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर सतत जळजळ होत असल्यास हा केवळ सामान्य त्रास आहे, असे समजून दुर्लक्ष करू नका.
तोंडाच्या आतील भागात दिसणारे पांढरे डाग हे ल्युकोप्लाकिया या विकाराचे लक्षण असू शकतात. इतर कारणांमुळे हे डाग झालेले नाहीत, हे तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर या विकाराचं निदान केलं जातं. काही वेळा या पांढऱ्या डागांमध्ये पेशींमध्ये असामान्य बदल झालेले असू शकतात.
तोंडाच्या आतील भागात लाल डाग दिसत असतील, तर त्यांचीही तपासणी करणं महत्त्वाचं आहे. या स्थितीला एरिथ्रोप्लाकिया म्हणतात. अशा लाल डागांमध्ये कॅन्सर होण्यापूर्वीचे बदल आढळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे असे डाग दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तोंडात जखम होणं, पांढरे किंवा लाल डाग दिसणं, सतत जळजळ होणं, विनाकारण रक्त येणं, गाठ जाणवणं किंवा तोंड उघडताना त्रास होणं ही लक्षणं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. सुपारी, पान किंवा गुटखा खाण्याची सवय असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. तोंडाच्या आतील भागात कोणताही असामान्य बदल दिसत असेल आणि तो दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ कायम राहत असेल, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
तपासणीदरम्यान तोंडाच्या आतील भागात काही संशयास्पद बदल आढळल्यास डॉक्टर पुढील चाचण्या करण्यास सांगू शकतात. गरज भासल्यास बायोप्सी केली जाऊ शकते. या तपासणीत संशयास्पद भागातील ऊतींचा छोटा नमुना घेऊन त्याची तपासणी केली जाते. वेळीच निदान झाल्यास संबंधित भागावर लक्ष ठेवणं, आवश्यक तपासण्या करणं आणि योग्य उपचार सुरू करणं शक्य होतं.
टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.