आंध्र प्रदेशातील नरसारावपेटमध्ये पोटदुखीची तक्रार घेऊन रुग्णालयात आलेल्या एका महिलेच्या तपासणीदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आलाय. सुरुवातीला ही साधी पोटदुखी असल्याचं वाटत होतं. मात्र अधिक तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनाही धक्का बसला. महिलेच्या पोटात अनेक बाहेरच्या वस्तू असल्याचं आढळून आलं.
महिलेची प्रकृती लक्षात घेऊन डॉक्टरांनी तातडीने आवश्यक तपासण्या आणि उपचार सुरू केले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे महिलेची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. ही महिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.
रूग्णालयात आल्यानंतर महिलेची सुरुवातीला ईसीजी आणि एंडोस्कोपी करण्यात आली. त्यावेळी ईसीजीचा रिपोर्ट सामान्य आला. मात्र एंडोस्कोपी करताना डॉक्टरांना महिलेच्या पोटात अनेक पेन, एक मेणबत्ती आणि लाकडी चमच्यासारख्या वस्तू दिसून आल्या. यानंतर डॉक्टरांनी अधिक स्पष्ट माहिती मिळवण्यासाठी सीटी स्कॅन केला. त्यातूनही पोटात या वस्तू असल्याचं स्पष्ट झालं. परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी वेळ न घालवता या वस्तू बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टर रामचंद्र रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पोटात असलेला एक पेन सुमारे 25 सेंटीमीटर लांब होतं. या पेनामुळे महिलेच्या शरीरात गंभीर दुखापत झाली होती. त्यातून न्यूमोमीडियास्टिनमसारखी गुंतागुंत निर्माण झाली होती. महिलेची स्थिती लक्षात घेऊन डॉक्टरांनी एंडोस्कोपी आणि लॅप्रोस्कोपीच्या मदतीने पोटात अडकलेल्या वस्तू बाहेर काढल्या.
शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना महिलेच्या पोटातून एक-दोन नव्हे, तर तब्बल 13 पेन बाहेर काढले. याशिवाय एक मेणबत्ती आणि पाच लाकडी चमचेही पोटातून काढण्यात आले. एवढ्या वस्तू महिलेच्या पोटात कशा गेल्या, यामुळे डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. त्यातही सुमारे 25 सेंटीमीटर लांबीचा पेन शरीराच्या आतपर्यंत पोहोचल्याचे पाहून डॉक्टरही चक्रावले.
डॉक्टरांनी महिलेची चौकशी केली असता, हा प्रकार पहिल्यांदाच घडला नसल्याचं समोर आलं. महिलेने सांगितले की, सुमारे एक वर्षापूर्वीही तिने चार पेन गिळले होते. त्यावेळीही शस्त्रक्रिया करून हे पेन शरीरातून बाहेर काढण्यात आले होते. त्या घटनेनंतर महिलेला मानसिक आरोग्य तज्ज्ञांकडे पाठवण्यात आले होते. तिच्यावर उपचारही सुरू होते.
BBC च्या अहवालानुसार, डॉक्टरांनी सांगितले की यावेळी महिलेचा तिच्या वडिलांसोबत वाद झाला होता. त्यानंतर तिने या वस्तू गिळल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं. डॉक्टरांच्या मते, एखाद्या व्यक्तीकडून अशा प्रकारे वारंवार वस्तू गिळण्यामागे मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या असण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांवर केवळ शस्त्रक्रिया करून उपचार पूर्ण होत नाहीत. त्यांच्या मानसिक आरोग्याकडेही तितकेच लक्ष देणे गरजेचे असते.
डॉक्टरांच्या मते, पेन किंवा इतर टोकदार वस्तू गिळल्यास शरीराच्या आत गंभीर दुखापत होऊ शकते. अशा वस्तूंमुळे पोट किंवा आतड्याला छिद्र पडण्याचा धोका असतो. त्यातून शरीरात संसर्ग होऊ शकतो आणि परिस्थिती गंभीर झाल्यास सेप्टिक शॉकसारखी जीवघेणी समस्या निर्माण होऊ शकते. काही वस्तू मात्र बराच काळ पोटात अडकून राहू शकतात. त्यानंतर अचानक पोटदुखी, उलट्या किंवा आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.