मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये ३० वर्षीय जितिन शिर्के याच्यावर दुसरं लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वी करण्यात आलंय. जितिनचं पहिलं लिव्हर ट्रान्सप्लांट १९ वर्षांपूर्वी झालं होतं. त्यावेळी वडिलांनी यकृताचा काही भाग दान केला होता, तर यावेळी त्याच्या आईने यकृताचा काही भाग दान करून मुलाला जीवदान दिलं. सध्या जितिनची प्रकृती सुधारत असून तो पुन्हा कामावर रुजू झालाय.
जितिनला लहानपणीच ऑटोइम्यून सिरोसिस हा लिव्हरचा आजार झाला होता. त्यामुळे वयाच्या ११ व्या वर्षी डिसेंबर २००७ मध्ये त्याच्यावर पहिलं लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यात आलं होतं. त्यावेळी त्याच्या वडिलांनी यकृताचा डावा भाग दान केला होता.
पहिल्या शस्त्रक्रियेनंतर जितिनचं आयुष्य सामान्य झालं. तो त्याच्या करियरमध्ये अनेक गोष्टी साध्य करत होता. मात्र फेब्रुवारी २०२६ मध्ये नियमित रक्ततपासणीदरम्यान त्याच्या लिव्हचं काम बिघडल्याचं समोर आलं.
डॉक्टरांनी विविध तपासण्या करून उपचार सुरू केलं. मात्र त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्याचं शरीर आधी प्रत्यारोपण केलेलं लिव्हर स्वीकारत नव्हतं. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जितिनने जसलोक हॉस्पिटलमधील यकृतविकार तज्ज्ञ डॉ. आभा नागराल यांचा सल्ला घेतला. त्याच्या वैद्यकीय तपासण्या आणि आधीच्या उपचारांचा आढावा घेतल्यानंतर डॉक्टरांनी दुसऱ्या प्रत्यारोपणासाठी तयारी सुरू केली. जून महिन्याच्या अखेरीस जितिनच्या रक्तातील अमोनियाचं प्रमाण खूप वाढलं. त्यामुळे त्याची शुद्ध हरपली आणि त्याला अतिदक्षता विभागात दाखल करावं लागलं. त्याच्या लिव्हरचं काम खूपच बिघडल्याने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
जितिनच्या आईचं लिव्हर प्रत्यारोपणासाठी योग्य असल्याचं तपासणीत स्पष्ट झालंय. त्यानंतर ५ जुलै २०२६ रोजी त्याच्यावर दुसरं लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यात आलं. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
जसलोक हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाच्या संचालक आणि यकृतविकार तज्ज्ञ डॉ. आभा नागरल यांनी सांगितलं की, प्रत्यारोपणानंतर रुग्णाची दीर्घकाळ काळजी घेणं गरजेचं असतं.
“जितिनच्या प्रकृतीत उपचार करूनही सुधारणा होत नव्हती. त्यामुळे दुसरं प्रत्यारोपण करणं आवश्यक झाल. प्रत्यारोपणानंतर रुग्णांनी नियमित औषधं घेणं, वेळेवर तपासण्या करणं आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहणं खूप महत्त्वाचं आहे,” असं डॉ. नागरल यांनी सांगितलं.
जसलोक हॉस्पिटलमधील लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरीचे तज्ज्ञ डॉ. अमित रस्तोगी यांनी सांगितलं की, रुग्णाची प्रकृती गंभीर असताना दुसरं प्रत्यारोपण करणं अधिक आव्हानात्मक असतं.
“दुसरं लिव्हर ट्रान्सप्लांट करताना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. शस्त्रक्रियेचं योग्य नियोजन आणि डॉक्टरांच्या वेगवेगळ्या टीममधील समन्वय महत्त्वाचा असतो. जितिनच्या आईने यकृताचा काही भाग दान करण्याचा घेतलेला निर्णय या शस्त्रक्रियेसाठी महत्त्वाचा ठरला,” असं डॉ. रस्तोगी यांनी सांगितलंय.
“जितिनच्या प्रवासातून अवयवदानामुळे एखाद्याचा जीव कसा वाचू शकतो, हे दिसून येतं. त्याच्या वडिलांनी २००७ मध्ये लिव्हरचा काही भाग दान केला होता. आता त्याच्या आईनेही तेच धैर्य दाखवलं. अशा रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यासाठी अनुभवी डॉक्टर आणि योग्य वेळी मिळणारे उपचार महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर ब्रेन डेड झालेल्या व्यक्तींच्या अवयवदानाबाबतही जनजागृती होणं गरजेचं आहे,” असे डॉ. माथूर यांनी सांगितलं.
जितिनच्या उपचारांमध्ये डॉक्टर, शस्त्रक्रिया तज्ज्ञ आणि अतिदक्षता विभागातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या आईने यकृताचा उजवा भाग दान केल्यामुळे दुसरं प्रत्यारोपण शक्य झालं.
जितिनने उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे आणि हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे आभार मानलेत. तसंच, पहिल्या प्रत्यारोपणाच्या वेळी यकृताचा काही भाग दान करणाऱ्या वडिलांचं आणि यावेळी यकृत दान करणाऱ्या आईचेही त्याने आभार मानलेत. या कठीण काळात साथ देणाऱ्या आपल्या होणाऱ्या पत्नीचेही त्याने आभार मानले. सध्या जितिनची प्रकृती सुधारत असून तो पुन्हा कामावर रुजू झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.