Monsoon Trek Saam tv
लाईफस्टाईल

Monsoon Trek : पावसाळ्यात ट्रेकिंगला जाण्याचा प्लान करताय? महाराष्ट्रातील ही 5 ठिकाणे ठरतील बेस्ट!

Travel Place : महाराष्ट्रातील ही 5 ठिकाणे तुमच्या ट्रेकसाठी बेस्ट ऑप्शन ठरतील.

कोमल दामुद्रे

Monsoon Travel Plan : पावसाळा म्हटलं की,आपल्या वेध लागतात ट्रेकिंगचे. जितक्या आतुरतेने मोर पावसाची वाट पाहात असतो तितक्याच आतुरतेने प्रत्येक गिर्यारोहक पावसाची वाट पाहातात असतात.

पहिल्या पावसाचे ढग दाटू लागले की सगळ्या गिर्यारोहकांची पाऊले वळतात ती डोंगर दऱ्यांच्या आणि किल्ल्यांच्या दिशेने. बरेच लोक तर चक्क उन्हाळ्यात (Summer) काम करून खास पावसाळ्यात गिर्यारोहणासाठी सुट्टी घेतात. मागील काही वर्षांपासून "Monsoon Treks"ची क्रेझ वाढलेली दिसून येते. त्यामुळे ट्रेकसाठीची मुख्य ठिकाणे मॉन्सून काळात गिर्यारोहकांच्या गर्दीने उफाळून निघतात. त्यामुळे जर तुम्हाला देखील "Monsoon Treks"चा आनंद घ्यायचा असेल तर महाराष्ट्रातील ही 5 ठिकाणे तुमच्या ट्रेकसाठी बेस्ट (Best) ऑप्शन ठरतील.

1. किल्ले विसापूर

समुद्रसपाटीपासून सुमारे १,०८२ फूट उंचीवर असलेला हा ऐतिहासिक किल्ला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात आहे. लोणावळ्याच्या पूर्व भागात आणि मळवली रेल्वेस्थानकाच्या दक्षिण भागात स्थित आहे. मुंबई-पुणे मार्गावर प्राचीन बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले भाजे गाव याच्या पायथ्याशी आहे. मोठे पठार असलेला किल्ला म्हणून याची ओळख आहे. कारवीचे जंगल पार करून खडकात खोदलेल्या पायऱ्या चढून किल्ल्यावर जाता येते.

वाटेत एक मारुतीची मूर्ती आणि खडक फोडून तयार केलेली पाण्याची टाकी आहे. त्यातील एका टाकीच्या माथ्यावर ब्राम्ही लिपित लिहीलेला एक शिलालेख आहे. किल्ल्याला कोकण दरवाजा आणि दिल्ली दरवाजा अशी दोन प्रवेशद्वारे असून उत्तम तटबंदी आहे. १८२० मध्ये ब्रिटीश काळात या दोन्ही दरवाजांची पडझड झाली. किल्ल्यातील पठारी भागात कोठीच्या इमारतीचे अवशेष आहेत, तसेच पठारावर एक टेकडी व दाट झाडी आहे. त्याचबरोबर किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष पाहायला मिळतील. तसेच गडावर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे व त्यासमोर एक मोठे तलाव देखील आहे.

2. किल्ले कोरीगड

समुद्रसपाटीपासून सुमारे ३,०५० फूट उंचीवर स्थित कोरीगड हा गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील लोणावळ्यापासून २० किमी अंतरावर जमिनीपासून ९२९ मीटर उंचीवर स्थित हा किल्ला दगड आणि चुनखडीपासून बनवण्यात आला आहे. किल्ल्याला एकुण ६०० पायऱ्या असून, कोराईगड आणि शहागड या नावांनी देखील प्रसिद्ध आहे. या किल्ल्याचे नाव 'कोरी' या कोळ्यांच्या पोट जातीतील एका प्रकारातून पडले आहे.

हा किल्ला लोणावळा आणि पाली यांच्यामध्ये असलेल्या सवाष्णी घाटाच्या माथ्यावर आहे. किल्ल्याला सुरूवातीला पायवाट व नंतर पायऱ्यांची वाट आहे. या वाटेत दोन खांबांवर तोललेली गुहा आणि बाजूला गणपतीची कोरीव मूर्ती आहे. गडावर चढताना अनेक ठिकाणी पाण्याचे टाके आहेत, किल्ल्याला गणेशद्वार आहे जे पूर्वाभिमूख गोमुखी आहे. याच्या संरक्षणासाठी चार बुरूजांची योजना केली आहे. किल्ल्यावर भलेमोठे पठार आहे. तसेच दिड किलोमीटर लांब तटबंदी आहे. यासोबतच गडावर महादेवाचे मंदिर, मंदिराच्यामागे दोन तलावं, चार ओतवी तोफा, बुरूज अशा अनेक पाहण्यासारख्या गोष्टी आहेत.

3. देवकुंड धबधबा

तीन धबधब्यांचा संगम असलेला हा देवकुंड धबधबा रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात येतो. पुण्यापासून फक्त काही तासांच्या अंतरावर असलेला हा धबधबा पावसाळ्यात तरुणाईचे लक्ष वेधून घेतो. डायनोसॉरच्या काळातील एखाद्या मोठ्या अजगराने टाकलेल्या कातीप्रमाणे भासणाऱ्या या धबधब्यावर जाण्यासाठी शारीरिक क्षमता अधिक असणे गरजेचे आहे.

भिरे गावापासून सुमारे दीड ते दोन तासांच्या ट्रेकनंतर तुम्ही देवकुंड धबधब्यावर पोहोचता. याचे एकुण अंतर ८ किमी इतके आहे. तर चांदणी चौकातून अंदाजे ७० किमी अंतरावर भिरा परिसर आहे. या परिसरात ग्रामस्थांच्या वतीने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. धबधब्यावर जाण्याकरीता प्रत्येक व्यक्तीकडून १० रुपये प्रवेश शुल्क घेतला जातो. येथे फिरण्यासाठी तुम्ही टूर गाइड देखील घेऊ शकता.

4. किल्ले हरीश्चंद्रगड

ठाणे, पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमेवर माळशेज घाटाच्या डावीकडे उभ्या असणाऱ्या डोंगरावर स्थित असलेला हरीश्चंद्रगड. हा किल्ला अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखरांपैकी एक आहे. हरिश्चंद्रगड हा ऐतिहासिक किल्ला असून, याची उंची १,४२४ मीटर इतकी आहे. हा गड ट्रेकिंगसाठी व पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. हरिश्चंद्रगड कलचुरी राजवटीतील ६ व्या शतकात बांधण्यात आला असून, ११ व्या शतकात यात विविध लेणी कोरण्यात आली. गडावर रोहिदास, तारामती आणि हरिश्चंद्र नावाची तीन शिखरे आहेत.

किल्ल्याच्या आत नागेश्वर मंदिर, बौद्ध लेण्या, विष्णू आणि गणेश यांची मंदिरे आहेत. तसेच या किल्ल्याला पौराणिक पार्श्वभूमी असून अनेक पुराणात या किल्ल्याचा उल्लेख दिसून येतो. या किल्ल्यावर उंच शिखरे, बुद्धांच्या सातहुन अधिक लेण्या आणि हरिश्चंद्राचे मंदिर देखील आहे. येथील कोकण कडा हे पाहण्यासारखे ठिकाण आहे. हा कडा साधारणतः १,७०० फूट उंचीवर आहे. पावसाळ्यात येथील नयनरम्य सौंदर्य पाहण्यासारखे असते.

5. किल्ले हरीहर

सह्याद्रीच्या रांगेत वसलेला हरीहर किल्ला हा हर्षगड किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. नाशिक येथे स्थित हा हरीहर किल्ला अनेक ट्रेक प्रेमींच्या आकर्षणाचे कारण ठरतो. परंतु, जमिनीपासून ३६७६ फूट अंतरावर असलेल्या या किल्ल्यावर गिर्यारोहण करणे तितके सोपे नाही. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे गड चढण्यासाठी कातळपायऱ्या आहेत. वर किल्ल्यावर लहानसे तलाव आहे, ज्याच्या काठालगत एक हनुमानाचे मंदिर व बाजूस महादेवाची पिंड देखील आहे. त्याचबरोबर आसपासच्या परिसरात ४ ते ५ पाण्याने भरलेल्या कातळटाक्या आहेत. गिर्यारोहणासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT