Eye Infection saam tv
लाईफस्टाईल

Eye Infection: पावसाळ्यात डोळ्यांचा संसर्ग झपाट्याने वाढतोय; ऑफिसमध्ये काम करताना ‘या’ चुका करणं टाळा

Monsoon Eye Infection: पावसाळ्यात ऑफिसमध्ये मद्रास आय म्हणजेच व्हायरल कंजंक्टिवायटिसचा संसर्ग वाढू शकतो. डोळे लाल होणे, पाणी येणे, जळजळ आणि टोचल्यासारखे वाटणे ही लक्षणे दिसल्यास संसर्ग टाळण्यासाठी काळजी घ्या आणि गरज असल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

पावसाळा सुरू झाला की सर्दी, तापासोबतच डोळे येण्याच्या तक्रारीही वाढतात. सर्वसामान्यांच्या भाषेत 'मद्रास आय' म्हणून ओळखला जाणारा व्हायरल कंजंक्टिवायटिस सध्या ऑफिसमध्येही झपाट्याने पसरताना दिसतोय. ऑफिसमधील गर्दी, एकमेकांच्या संपर्कात येणं, कॉमन वस्तूंचा वापर आणि बंदिस्त एसीचं वातावरण यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.

डोळे लाल होणं, सतत पाणी येणं, डोळ्यात टोचल्यासारखं वाटणं किंवा जळजळ होणं ही या संसर्गाची सामान्य लक्षणं आहेत. सुरुवातीला एका डोळ्याला संसर्ग होतो आणि काही वेळात दुसऱ्या डोळ्यालाही त्याची लागण होऊ शकते.

याबाबत वासन आयकेअर-एएसजी आय हॉस्पिटलचे चेन्नई रिजनचे हेड डॉ. कौशिक सांगतात, "पावसाळ्यात दमट आणि उष्ण वातावरणामुळे व्हायरल कंजंक्टिवायटिसचा प्रसार वाढतो. ऑफिसमध्ये अनेक जण तासन्‌तास एकत्र काम करत असल्याने आणि कॉमन वस्तू वापरत असल्याने हा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सहज पोहोचू शकतो."

ऑफिसमध्ये संसर्ग कसा पसरतो?

ऑफिसमध्ये दिवसभर अनेक वस्तूंना आपण हात लावत असतो. एखाद्या इन्फेक्टेड व्यक्तीने डोळ्यांना हात लावला आणि त्यानंतर कीबोर्ड, मोबाईल, दरवाजाचं हँडल, लिफ्टचं बटण किंवा मीटिंग टेबलला स्पर्श केला तर त्या वस्तूंना दुसऱ्या व्यक्तीने हात लावल्यानंतर संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

डॉ. कौशिक सांगतात, "डोळ्यांना वारंवार हात लावण्याची सवय संसर्ग पसरवण्याचा मोठा मार्ग ठरू शकते. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करताना चेहऱ्याला, विशेषतः डोळ्यांना हात लावणे टाळणे महत्त्वाचे आहे."

एसीच्या ऑफिसमध्येही वाढतो धोका?

ऑफिसमध्ये अनेक तास एसीच्या बंदिस्त वातावरणात राहावं लागतं. त्यामुळे डोळे कोरडे पडू शकतात आणि अस्वस्थता वाढू शकते. पावसाळ्यात बाहेरही दमट वातावरण असतं. त्यातच लोकल, बस किंवा इतर गर्दीच्या वाहनांमधून प्रवास करताना संसर्गाच्या संपर्कात येण्याची शक्यता वाढते.

'डोळे आले' तर ऑफिसला जाणं टाळा

डोळा लाल झाला, सतत पाणी येत असेल किंवा डोळ्यात टोचल्यासारखे वाटत असेल तर इतरांच्या संपर्कात येणं टाळणं योग्य आहे. शक्य असल्यास काही दिवस घरून काम करावं. यामुळे ऑफिसमधील इतर कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका कमी होऊ शकतो.

"लक्षणं दिसताच स्वतःला इतरांपासून दूर ठेवणं, हात वारंवार धुणं आणि वैयक्तिक वस्तू शेअर न करणं हे संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वाचं आहे," असं डॉ. कौशिक सांगतात.

या गोष्टी नक्की करा

  • डोळ्यांना वारंवार हात लावू नका.

  • हात साबणाने वारंवार स्वच्छ धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा.

  • टॉवेल, रुमाल, चष्मा, आय ड्रॉप किंवा मेकअपचं सामान इतरांसोबत शेअर करू नका.

  • कीबोर्ड, फोन, दरवाजाचं हँडल आणि लिफ्टची बटणं यांसारख्या कॉमन वस्तू स्वच्छ ठेवा.

  • डोळे लाल झाले किंवा पाणी येत असेल तर शक्यतो ऑफिसला जाणं टाळा.

  • स्वतःच्या मनाने जुने अँटीबायोटिक आय ड्रॉप्स वापरू नका.

  • त्रास वाढत असेल किंवा काही दिवसांत आराम मिळत नसेल तर नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

"घरगुती उपाय किंवा आधी उरलेले आय ड्रॉप्स स्वतःच्या मनाने वापरणं टाळावं. लक्षणं वाढत असतील किंवा दीर्घकाळ टिकत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे," असा सल्लाही डॉ. कौशिक यांनी दिलाय.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT