Surabhi Jayashree Jagdish
उच्च रक्तदाबाची सुरुवातीच्या टप्प्यात बहुतेक वेळा कोणतीही ठळक लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे अनेकांना वर्षानुवर्षे आपला रक्तदाब वाढलेला आहे याची कल्पनाच नसते. वेळेत निदान आणि उपचार न झाल्यास हा आजार हृदय, मेंदू आणि किडनीवर गंभीर परिणाम करू शकतो.
रक्तदाब 140/90 mmHg किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास हार्ट अटॅकचा येण्याचा धोका वाढतो. 140/90 म्हणजे लगेच हार्ट अटॅक येणारच असं नाही तर हा वाढत्या धोक्याचा इशारा मानला जातो. मधुमेह, धूम्रपान, उच्च कोलेस्टेरॉल आणि लठ्ठपणा यांसारखे इतर घटकही हा धोका अधिक वाढवतात.
सतत वाढलेला रक्तदाब हृदयाला अधिक ताकदीने रक्त पंप करण्यास भाग पाडतो. त्यामुळे हृदयाच्या स्नायूंवर अतिरिक्त ताण येतो आणि रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊ शकतं. दीर्घकाळ अशी स्थिती राहिल्यास हार्ट अटॅक, हार्ट फेल्युअर आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
उच्च रक्तदाबाची नेहमीच लक्षणं दिसतात असं नाही त्यामुळे नियमित तपासणी करणं आवश्यक असतं. काही रुग्णांमध्ये तीव्र डोकेदुखी, छातीत दुखणं, डोळे लाल होणं किंवा धूसर दिसणं अशी लक्षणं दिसू शकतात.
उच्च रक्तदाबाचं निदान फक्त रक्तदाब मोजूनच निश्चित करता येतं. त्यामुळे विशेषतः 40 वर्षांवरील व्यक्तींनी किंवा जोखीम असलेल्या लोकांनी नियमित बीपी तपासून घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधं आणि जीवनशैलीतील बदल यामुळे गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.
आहारातील मीठाचं प्रमाण कमी ठेवणं आणि नियमित व्यायाम करणं रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. धूम्रपान, मद्यपान आणि तणाव कमी करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घेणं आणि स्वतःहून औषधं बंद न करणं आवश्यक आहे.
रक्तदाब खूप वाढलेला असताना छातीत तीव्र वेदना, श्वास घेण्यास त्रास किंवा अचानक अशक्तपणा जाणवत असल्यास तातडीने रुग्णालयात जावं. बोलण्यात अडचण, चेहरा किंवा हात-पाय सुन्न होणं ही स्ट्रोकची लक्षणंही असू शकतात.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.