Surabhi Jayashree Jagdish
जगभरात आणि भारतातही लिव्हर कॅन्सरच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे अनेक अभ्यासांमध्ये दिसून आले आहे. यामागे फॅटी लिव्हर, लठ्ठपणा आणि मधुमेहाचं वाढतं प्रमाण हे महत्त्वाचं कारण मानलं जातं.
काही लोकांमध्ये हेपाटायटिस बी आणि हेपाटायटिस सी या व्हायरसचा दीर्घकालीन संसर्ग असतो. या संसर्गामुळे यकृताचं नुकसान होत राहतं आणि कालांतराने कॅन्सरचा धोका वाढू शकतो. नियमित तपासणी आणि वेळेवर उपचार केल्यास हा धोका काही प्रमाणात कमी करता येतो.
दीर्घकाळ फॅटी लिव्हर किंवा सिरोसिस असल्यास लिव्हरच्या पेशींमध्ये बदल होऊ शकतात. हे बदल पुढे काही रुग्णांमध्ये कॅन्सरमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता वाढवतात. त्यामुळे अशा रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने नियमित तपासणी करणं आवश्यक असतं.
दीर्घकाळ अतिप्रमाणात मद्यपान केल्याने यकृताचं गंभीर नुकसान होतं. हेपाटायटिस बी किंवा सी संसर्गासोबत मद्यपानाची सवय असल्यास धोका अधिक वाढतो. निरोगी जीवनशैली आणि योग्य उपचारांमुळे हा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
काही रुग्णांमध्ये घोटं आणि पायांमध्ये सूज येऊ शकतं. यकृताचं कार्य कमी झाल्यास शरीरात द्रव साचल्यामुळे अशी सूज निर्माण होऊ शकते. मात्र हे लक्षण हृदय, किडनी किंवा इतर आजारांमुळेही दिसू शकतं.
काही रुग्णांना पायांमध्ये अशक्तपणा वाटू लागतो. यकृताच्या दीर्घकालीन आजारांमुळे शरीरातील पोषण कमी पडल्याने अशी समस्या उद्भवू शकते. हे लक्षण इतर अनेक कारणांनीही दिसू शकते त्यामुळे वैद्यकीय तपासणी आवश्यक असते.
काही रुग्णांच्या पायांवर तीव्र खाज, त्वचा कोरडी पडणं किंवा रंगात बदल जाणवू शकतो. यकृताचं कार्य बिघडल्याने शरीरात पित्तद्रव्यं साचल्यास अशी लक्षणं दिसू शकतात. ही लक्षणं दिसल्यास आवश्यक तपासण्या करून घेणं महत्त्वाचं आहे.