Surabhi Jayashree Jagdish
हार्ट अटॅक हा बहुतेक वेळा अचानक घडणारा प्रकार नसतो तर त्याआधी शरीर काही महत्त्वाची लक्षणं दिसून येतात. ही लक्षणं अनेकदा काही दिवस किंवा महिनाभर आधी जाणवू शकतात. त्यामुळे शरीरातील कोणताही असामान्य बदल सतत जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
छातीत दुखणं, थकवा किंवा श्वास घेण्यास त्रास यांसारखी लक्षणं सामान्य समजून दुर्लक्षित केली जातात. मात्र हीच लक्षणं हृदयाच्या समस्येची सुरुवात असू शकतात. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास हार्ट अटॅकचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते.
छातीत दडपण, जळजळ, घट्टपणा किंवा हलकं दुखणं वारंवार होत असेल तर ते हृदयाशी संबंधित असू शकते. ही वेदना खांदे, पाठ, जबडा किंवा हातांपर्यंतही पसरू शकते. गॅस किंवा ॲसिडिटी समजून या त्रासाकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
हृदय शरीराच्या सर्व भागांना पुरेसा ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा करू शकत नसल्यास सतत थकवा जाणवू शकतो. अगदी साधी कामं केल्यानंतरही अशक्तपणा किंवा दमल्यासारखं वाटणं हे इशारा असू शकतो.
कमी श्रमाचं काम केल्यानंतरही श्वास लागणं किंवा दम लागणं हे हृदयाचं कार्य नीट नसल्याचे लक्षण असू शकतं. अशावेळी फुफ्फुसांपर्यंत पुरेसा ऑक्सिजन पोहोचण्यात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे लक्षण कधीही दुर्लक्षित करू नये.
रात्री वारंवार जाग येणं, अस्वस्थ वाटणं किंवा अचानक भीतीची भावना निर्माण होणं हीदेखील हार्ट अटॅकपूर्वीची लक्षणे असू शकतात. काही वेळा हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे अशी लक्षणे दिसू शकतात.
थंड वातावरणात किंवा कोणतेही शारीरिक श्रम न करता अचानक जास्त घाम येणं हे हृदयाच्या कार्यात अडथळा निर्माण झाल्याचे संकेत असू शकतात. शरीर अशा प्रकारे धोक्याचा इशारा देत असतं.