अनेकदा आपण मोठ्या आवडीने भाजी किंवा करी बनवतो. मात्र, चुकून पाणी जास्त पडल्याने भाजीचा रस्सा पातळ होते. अशावेळी ती घट्ट करण्यासाठी जास्त वेळ उकळण्याचा प्रयत्न केला जातो. पण असे केल्याने भाजीची चव आणि रंग दोन्ही बदलू शकतात. विशेष म्हणजे, रस्सा घट्ट करण्यासाठी बाजारातून कोणतेही वेगळे पदार्थ आणण्याची गरज नाही. आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या काही पदार्थांच्या मदतीने भाजीची चव कायम ठेवत रस्सा घट्ट करता येतो.
भाजीचा रस्सा घट्ट करण्यासाठी कॉर्नफ्लोअर हा सोपा उपाय आहे. एका छोट्या वाटीत एक चमचा कॉर्नफ्लोअर घेऊन त्यात थोडे थंड पाणी मिसळा आणि पातळ मिश्रण तयार करा. हे मिश्रण उकळत्या रस्स्यात हळूहळू घाला. त्यानंतर सतत ढवळत साधारण दोन मिनिटे शिजवा. कॉर्नफ्लोअरला स्वतःची ठळक चव किंवा वास नसल्यामुळे भाजीच्या मूळ चवीत फारसा बदल होत नाही.
भाजीची रस्सा घट्ट करण्यासाठी उकडलेला बटाटा हा घरगुती आणि प्रभावी पर्याय आहे. एक उकडलेला बटाटा किसून घ्या किंवा व्यवस्थित मॅश करा. त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या. त्यानंतर हा बटाटा पातळ रस्स्यात मिसळा. बटाट्यातील नैसर्गिक स्टार्च अतिरिक्त पाणी शोषून घेतो आणि रस्साला घट्टपणा देतो.
छोले, राजमा किंवा मसालेदार भाज्यांची रस्सी घट्ट करण्यासाठी भाजलेले बेसन उपयुक्त ठरते. एका कढईत एक ते दोन चमचे बेसन मंद आचेवर हलके सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर त्यात थोडे पाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट भाजीमध्ये मिसळा. यामुळे रस्सा घट्ट होण्यासोबतच भाजीची चवही अधिक खुलते. मात्र, कच्चे बेसन थेट भाजीमध्ये टाकणे टाळावे.
शाही पनीर, मखनी किंवा रेस्टॉरंटसारखी क्रीमी भाजी बनवत असाल, तर हा उपाय उत्तम आहे. काही काजू किंवा खरबुजाच्या बिया गरम पाण्यात साधारण १५ मिनिटे भिजत ठेवा. त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट भाजीच्या रस्स्यात मिसळा. यामुळे रस्सा घट्ट होण्यासोबतच तिला छान क्रीमी टेक्स्चर मिळते.
भाजीमध्ये कोणताही अतिरिक्त पदार्थ घालायचा नसेल, तर हा उपाय करून पाहा. भाजीसाठी तयार केलेलाच मसाला म्हणजे त्यामध्ये वापरलेला कांदा, टोमॅटोचा मसाला काढून मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट तयार करा आणि पुन्हा भाजीमध्ये मिसळा. यामुळे भाजीच्या मूळ चवीत बदल न होता रस्साला घट्टपणा येण्यास मदत होते.
भाजीची रस्सी घट्ट करताना कॉर्नफ्लोअर, बेसन किंवा इतर कोणताही घटक एकदम जास्त प्रमाणात घालू नका. सुरुवातीला थोडेच मिश्रण घालून भाजी व्यवस्थित ढवळा. आवश्यकतेनुसार पुन्हा थोडे मिश्रण घाला.अन्यथा रस्सा प्रमाणापेक्षा जास्त घट्ट किंवा चिकट होऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.