why do people talk in their sleep : झोपेत पुटपुटणे अथवा बडबड करण्याची अनेकांना सवय असते. तुमच्या आजूबाजूलाही अशी काही माणसं असू शकतात. झोपेत पुटपुटणं अथवा बडबड करणे, ही अनेकदा आपल्याला साधी सवय अथवा थकव्याचे लक्षण वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का? हीच साधी सवय पुढे जाऊन एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण बनू शकते. झोपेत बोलण्यामागचे नेमके कारण काय? कधी ही चिंतेची बाब बनते? याबाबत जाणून घेऊयात.. (Why do people talk in their sleep)
झोपेत बोलणे किंवा पुटपुटणे याला मेडिकल टर्ममध्ये 'सोम्निलोक्वी' (Somniloquy) असे म्हणतात. झोपेत असताना व्यक्ती काही मोजके शब्द बोलते, अर्धवट वाक्ये उच्चारते किंवा कधीकधी मोठ्याने ओरडते सुद्धा. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सकाळी झोपेतून उठल्यावर आपण रात्री काय बोललो हे त्या व्यक्तीला अजिबात आठवत नाही. (Somniloquy meaning in Marathi)
झोपेत बोलण्याची ही सवय अजिबात गंभीर नाही. पण जर दररोजच अथवा वारंवार झोपेत बोलत असेल आणि त्यासोबत इतर त्रास होत असतील, तर मात्र याकडे दुर्लक्ष करू नका. मानसोपचारतज्ज्ञ डॉ. समीर भार्गव यांनी indiatv ला दिलेल्या माहितीनुसार ही सवय एखाद्या आजाराचे लक्षण होऊ शकते.
झोपेत पुटपुटण्याची कारणे काय असतात?
झोपेत बोलण्यामागे अनेक कारणे असू शकतात. मानसिक ताण, चिंता, झोपेची कमतरता अथवा चुकीची दिनचर्या यासारखी कारणे असू शकतात. एखादी व्यक्ती खूप टेन्शनमध्ये असते किंवा सतत कशाचा तरी विचार करत राहते, तेव्हा झोपेवर परिणाम होतो. हाच ताण कधीतरी झोपेत बोलण्याच्या रूपात बाहेर येतो. त्याशिवाय अंगात ताप असणे, काही औषधांचे साईड इफेक्ट्स, दारूचे सेवन किंवा झोपेशी संबंधित इतर त्रास यामुळेही असे होऊ शकते. लहान मुलांमध्ये झोपेत बोलणे अगदी सामान्य असते आणि वय वाढले तसे ते कमी होते.
हे एखाद्या मानसिक आजाराचे लक्षण असते का?
फक्त झोपेत बोलण्यावरून हा मानसिक आजार आहे, असे अजिबात म्हणता येत नाही. पण जर झोपेत बोलण्यासोबतच सतत चिंता वाटणे, उदास वाटणे, विनाकारण राग येणे, भीती वाटणे किंवा स्वभावात बदल होणे अशी लक्षणे दिसत असतील, तर मात्र मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावाच.
काही वेळा झोपेत बोलताना इतर त्रासही असू शकतात. झोपेत जोरात ओरडणे किंवा हात-पाय हालवणे, घाबरून अचानक झोपेतून जागं होणे, झोपेतील स्वप्नांप्रमाणे अंगाची हालचाल करणे, घोरण्यासोबतच श्वास घ्यायला त्रास होणे यासारखी लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावाच.
ही सवय कशी सुधारता येईल? या गोष्टी नक्की करा...
दररोज ७ ते ९ तास गाढ आणि पुरेशी झोप घ्या.
झोपण्याची आणि उठण्याची वेळ नियमित ठेवा.
झोपण्याच्या आधी मोबाईलचा वापर टाळा.
चहा-कॉफीचे सेवन कमी करा.
मन शांत ठेवण्यासाठी ध्यान (Meditation) किंवा दीर्घ श्वासोच्छ्वास करा.
डॅाक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?
झोपेत बोलणे एकदम सुरू झाले आणि वारंवार होत असेल. रात्रीची झोप व्यवस्थित होत नसेल. झोपेत ओरडणे, कुणाला मारल्यासारखे करणे किंवा स्वतःला दुखापत होत असेल. दिवसभर खूप जास्त झोप येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.