Headache
Headache  Saam Tv
लाईफस्टाईल

Headache : डोके दुखी वाढलीये ? तुमच्या डोक्यात पाणी तर साठले नाही ना, वेळीच लक्ष द्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Headache : डोक्यात पाणी होणे ही समस्या सर्वच वयोगटातील व्यक्तींना होऊ शकते. त्यातही प्रामुख्याने लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. डोक्यात जास्त पाणी साठण्यामुळे डोक्यातील दाब वाढतो. यामुळे मेंदूला सूज येऊ शकते.

डोक्यात पाणी साठणे या आजाराला इंग्रजीमध्ये हायड्रोसेफलस असे म्हणतात. हायड्रोसेफलस ही एक धोकादायक स्थिती असून यावर वेळीच उपचार होणे आवश्यक असते. कारण यामुळे मेंदूचे नुकसान होऊ शकते. डोक्यात पाणी होणे याची कारणे, लक्षणे (Symptoms)आणि उपचार याविषयी माहिती डॉ. सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे. सेरेब्रोस्पाइनल फ्लुइडच्या असंतुलनामुळे हा आजार होतो. आपल्या शरीरात मेंदू आणि मणक्याच्या भोवती सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड (CSF) नावाचा द्रवपदार्थ वाहत असतो. सामान्य स्थितीमध्ये रक्तवाहिन्या ह्या CSF द्रवपदार्थ शोषून घेत असतात. मात्र काही कारणामुळे ह्या CSF द्रव्याचे प्रमाण अधिक वाढल्यास डोक्यात (Head) पाणी होण्याची स्थिती निर्माण होते.

खालील तीन कारणांमुळे CSF द्रव्याचे प्रमाण अधिक वाढू लागते.

१) सेरेब्रोस्पाइनल फ्लुइडच्या प्रवाहात अडथळा आल्याने जास्त प्रमाणात CSF जमा होऊ लागतो.

२) रक्तवाहिन्यांद्वारे CSF द्रव शोषून घेण्याची क्षमता कमी झाल्यामुळे हा द्रवपदार्थ अधिक जमा होतो.

३) जर मेंदू अधिक प्रमाणात CSF द्रव्य तयार करीत असल्यास याचे प्रमाण अधिक वाढते.

याशिवाय जन्मजात मणक्यातील दोष, आनुवंशिकता, गर्भावस्थेत रूबेलाचे इन्फेक्शन झाल्यानेही डोक्यात पाणी होण्याची समस्या होऊ शकते. लहान मुलांमध्ये डोक्यात पाणी साठणे ही समस्या अधिक आढळते. मुलांमध्ये प्रामुख्याने मेंदुज्वर, मेंदूत रक्तस्त्राव होणे, डिलिवरीवेळी बाळाच्या डोक्याला दुखापत होणे, ट्यूमर अशा अनेक कारणांमुळे लहान मुलांना डोक्यात पाणी होण्याची समस्या होऊ शकते.

डोक्यात पाणी साठणे याची लक्षणे -

१) बऱ्याच दिवसांपासून डोके दुखणे.

२) मळमळ व उलट्या होणे.

३) अंधुक दिसणे.

४) नजर स्थिर ठेवता न येणे.

५) शरीराचा तोल सांभाळता न येणे.

६) अचानक तोल जाऊन पडणे.

७) चालण्यास त्रास होणे.

८) वारंवार लघवीला होणे.

९) अधिक झोप येणे यासारखी लक्षणे यामध्ये असू शकतात.

लहान मुलांमध्ये आढळणारी लक्षणे -

१) मुलाला उलट्या होणे.

२) डोळे खालच्या बाजूस होतात.

३) अधिक झोप येणे.

४) चिडचिड करणे.

५) भूक कमी होणे.

६) झटके येणे.

७) डोके मोठे झाल्यासारखे वाटणे.

अशी लक्षणे लहान मुलांमध्ये डोक्यात पाणी साठणे या आजारात दिसू शकतात.

हायड्रोसेफलसचे निदान -

डोक्यात पाणी साठले आहे की नाही याचे निदान करण्यासाठी आपले डॉक्टर अल्ट्रासाऊंड तपासणी, सीटी स्कॅन, MRI स्कॅन, एक्स-रे यासारख्या तपासण्या करू शकतात.

डोक्यात पाणी साठणे यावर उपचार -

डोक्यात पाणी साठणे ही एक धोकादायक स्थिती असून यावर वेळीच उपचार होणे आवश्यक आहे. उपचार न केल्यास ब्रेन डॅमेज होण्याचा धोका असतो. उपचारामध्ये शंट घालणे, वेंट्रिक्युलोस्टोमी यासारख्या शस्त्रक्रिया करतात. ऑपरेशनमध्ये एक पातळ ट्युब जोडून अतिरिक्त सेरेब्रोस्पाइनल फ्लुइड या ट्युबमधून दुसरीकडे जाईल याची व्यवस्था केली जाते.

डोक्यात पाणी साठू नये यासाठी घ्यायची काळजी -

१) लहान मुलांच्या डोक्याला दुखापत होणार नाही याची काळजी घ्यावी.

२) बालकांना मेंदुज्वर या आजारासंबंधित लस द्यावी.

३) मोठ्या व्यक्तींनी डोक्याला मार लागणार नाही याची काळजी घ्यावी. वाहन चालवताना हॅल्मेट आणि सीटबेल्टचा वापर करावा.

४) बऱ्याच दिवसांपासून डोके दुखणे, उलट्या होणे, झोप अधिक येणे अशी लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांकडे जाऊन योग्य निदान व उपचार घ्यावेत.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2024: गुटख्याच्या पुडीने नाणेफेकचा सराव करावा! १० वेळा टॉस गमवणाऱ्या ऋतुराजची दिग्गज माजी क्रिकेटर घेतली फिरकी

Sharad Pawar Health News | शरद पवार यांची तब्येत बिघडली, सर्व कार्यक्रम रद्द

Nashik Lok Sabha: शिंदे गटाची ताकद वाढली, ठाकरेंना जबर धक्का; बड्या नेत्याने ऐनवेळी सोडली साथ

Palghar News: दाभोसा धबधब्यात पोहण्यासाठी गेला, १२० फुटावरून उडी मारली अन् डोहात बुडाला; तरुणाचा भयानक मृत्यू

Shahaji Patil: काय झाडी काय डोंगर.. डायलॉग फेम आमदार शिवसेनेत कसे आले? शहाजी पाटलांनीच केला खुलासा

SCROLL FOR NEXT