हार्ट अटॅकची प्रकरणं दिवसेंदिवस वाढत असून ही परिस्थिती जीवघेणी ठरतेय. या समस्येमध्ये हृदयाच्या स्नायूंना पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. रक्त न पोहोचल्याने हृदयाचे स्नायू मरतात. अशावेळी वेळेत व्यक्तीच्या हृदयाला रक्तपुरवठा झाला नाही तर गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, २०२२ मध्ये संपूर्ण जगात १९.८ दशलक्ष लोकांचा मृत्यू हृदयाच्या समस्यांमुळे झाला. हा आकडा जागतिक मृत्यूंपैकी ३२ टक्के इतका होता. हार्ट अटॅक ही एक गंभीर परिस्थिती असून वेळेत उपचार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अशावेळी सकाळच्या वेळी दिसून येणारी लक्षणं ओळखल्यास यामुळे निर्माण होणारा गंभीर धोका टाळता येऊ शकतो.
हार्ट अटॅकचं एक सामान्य लक्षण म्हणजे छातीत अस्वस्थता वाढणं. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत गाठी तयार होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी छातीत दडपण किंवा जळजळ होण्याचा धोका असतो.
सकाळी उठल्यावर अचानक श्वास घेण्यास त्रास होत असल्याचा अर्थ असतो की, हृदय नीट रक्त पंप करू शकत नाही. अशावेळी लोकांना छातीत वेदना नसतानाही श्वास घ्यायला त्रास होतो. धमन्यांमध्ये प्लॅक साचल्यामुळे ही समस्या वाढू शकते.
रात्रीच्या वेळेस हृदयावर ताण आला की, व्यक्तीला थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो. अशावेळी व्यक्तीला साधी कामं करण्यासही त्रास होऊ लागतो. संशोधनानुसार, हे लक्षण ४०-७०% रुग्णांमध्ये हार्ट अटॅक येण्याच्या काही आठवडे आधी दिसून येतं.
सकाळी मळमळ, उलटी किंवा अपचनासारखं वाटणं हे पचनसंस्थेचं लक्षण अनेकांना वाटू लागतं. मात्र हा त्रास हृदयावर येणाऱ्या ताणामुळे होतो. सकाळी उपाशी असताना पोटातील आम्ल वाढल्यामुळे ही समस्या अधिक जाणवते. हार्ट अटॅक येणाऱ्या २५ ते ३० टक्के रूग्णांमध्ये हा त्रास दिसून येतो.
सकाळी उठल्यावर चेहरा, मान किंवा छातीवर थंड, चिकट घाम येणं हे हृदय कमकुवत झाल्याचे संकेत असतात. शरीर Adrenaline सोडतं ज्यामुळे हृदयाला मदत मिळते, पण यामुळे घाम वाढतो. हे लक्षण २५-४०% रुग्णांमध्ये दिसून येतं.
सकाळी उठल्यावर अचानक चक्कर येणं हे रक्तदाब अचानक कमी झाल्याचं लक्षण आहे. रात्री झोपल्यामुळे आणि सकाळी हार्मोन्स वाढल्यामुळे ही समस्या अधिक जाणवते. हे लक्षण विशेषतः ४० वर्षांवरील लोकांमध्ये पाहायला मिळते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.