Mattress Cleaning Tips saam tv
लाईफस्टाईल

Mattress Cleaning Tips: न धुता गादीवर पडलेले डाग कसे काढायचे? हे सोपे उपाय आजच करून बघा, गादी दिसेल नव्यासारखी

How to Clean a Mattress: गादीला कुबट वास येतोय? चादर बदलूनही वास जात नसेल तर बेकिंग सोडा, व्हॅक्यूम क्लिनर आणि काही सोप्या घरगुती उपायांनी गादी स्वच्छ ठेवा. जाणून घ्या गादीवरील डाग कसे काढावेत, ओलावा कसा कमी करावा आणि गादीची काळजी कशी घ्यावी.

Surabhi Jayashree Jagdish

आपण दिवसातील अनेक तास गादीवर झोपतो. मात्र ज्या गादीवर आपण रोज झोपतो, तिच्या स्वच्छतेकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. रोजच्या वापरामुळे गादीमध्ये घाम, धूळ, त्वचेवरील डेड स्किन आणि ओलावा जमा होतो. त्यामुळे काही दिवसांनी गादीला कुबट किंवा विचित्र वास येऊ लागतो.

अनेकदा हा वास कितीही चादर बदलली तरी जात नाही. पण काळजी करण्याची गरज नाही. घरातील काही साध्या गोष्टींचा वापर करून तुम्ही गादी स्वच्छ करू शकता. त्याचप्रमाणे गादीचा कुबट वासही कमी करू शकता. जाणून घेऊया गादी स्वच्छ ठेवण्याचे काही सोपे उपाय.

सर्वात आधी गादी व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छ करा

गादी स्वच्छ करण्यापूर्वी त्यावर अंथरलेली चादर, गादीचं कव्हर आणि इतर वस्तू बाजूला काढून ठेवा. त्यानंतर व्हॅक्यूम क्लिनरच्या मदतीने संपूर्ण गादी स्वच्छ करून घ्या. व्हॅक्यूम क्लिनरसोबत अपहोल्स्ट्री अटॅचमेंट असेल तर त्याचाही वापर करू शकता. गादीचा फक्त मधला भाग स्वच्छ करून चालणार नाही.

गादीच्या कडा, शिवण असलेला भाग आणि कोपरेही व्यवस्थित स्वच्छ करा. कारण या ठिकाणी धूळ आणि घाण जास्त जमा होते. महिन्यातून किमान एकदा गादी व्हॅक्यूम केल्यास त्यावरील धूळ, त्वचेच्या मृत पेशी आणि अ‍ॅलर्जी निर्माण करणारे बारीक कण काढण्यास मदत होते.

बेकिंग सोड्याचा वापर करा

गादीला कुबट किंवा जुनाट वास येत असेल तर बेकिंग सोडा उपयोगी ठरू शकतो. यासाठी संपूर्ण गादीवर थोडा बेकिंग सोडा पसरवा. ज्या ठिकाणी जास्त वास येत आहे, त्या भागावर थोडा जास्त बेकिंग सोडा टाका.

हा बेकिंग सोडा काही तास गादीवर तसाच राहू द्या. शक्य असल्यास रात्रभरही ठेवू शकता. बेकिंग सोडा गादीतील ओलावा आणि वास कमी करण्यास मदत करतो. काही तासांनंतर व्हॅक्यूम क्लिनरने संपूर्ण गादी स्वच्छ करा. यामुळे गादीवर पडलेला बेकिंग सोडा पूर्णपणे निघून जाईल.

गादीवर डाग पडल्यास लगेच स्वच्छ करा

गादीवर चहा, कॉफी, जेवण किंवा इतर कोणताही द्रव पदार्थ सांडला, तर तो बराच वेळ तसाच ठेवू नका. कारण डाग जितका जास्त वेळ गादीवर राहील तितका तो काढणं कठीण होऊ शकतं. अशा वेळी हलके क्लिनर आणि थोडं पाणी वापरून डाग स्वच्छ करू शकता. पण डाग असलेली जागा जोरात घासू नका. त्याऐवजी स्वच्छ कपड्याने ती जागा हळूवार टिपून घ्या. जोरात घासल्यास सांडलेला द्रव गादीच्या आतल्या थरांपर्यंत जाऊ शकतो.

गादी स्वच्छ करताना जास्त पाणी किंवा कोणताही द्रव पदार्थ वापरणं टाळा. कारण गादीच्या आत ओलावा राहिल्यास कुबट वास आणखी वाढू शकतो. स्वच्छता केल्यानंतर गादी पूर्णपणे वाळू द्या. त्यानंतरच त्यावर चादर अंथरा.

गादी काही वेळ मोकळी हवेत ठेवा

गादीमध्ये साचलेला ओलावा आणि कुबट वास कमी करण्यासाठी तिला मोकळी हवा मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही चादर बदलता, तेव्हा गादी काही तास चादर किंवा कव्हर न घालता तशीच ठेवा. तसंच खोलीच्या खिडक्या उघड्या ठेवा, जेणेकरून खोलीत हवा खेळती राहील. हवामान चांगलं असेल आणि जागेची सोय असेल तर गादी काही वेळ उन्हातही ठेवू शकता. सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा यामुळे गादीतील ओलावा आणि वास कमी होण्यास मदत होते.

गादी पूर्ण वाळल्याशिवाय त्यावर चादर अंथरू नका

गादी स्वच्छ केल्यानंतर ती पूर्ण वाळण्यापूर्वीच पुन्हा चादर किंवा कव्हर घालणं ही मोठी चूक ठरू शकते. गादीच्या आत थोडाही ओलावा राहिला आणि त्यावर लगेच चादर अंथरली तर तो ओलावा आतच अडकून राहतो. त्यामुळे गादीला पुन्हा कुबट वास येऊ शकतो. गादी स्वच्छ करताना जास्त पाणी किंवा तीव्र रसायनांचा वापर करू नका. तसंच गादी जोरात घासणंही टाळा. कारण असं केल्याने डाग आणखी आत जाऊ शकतात.

गादी जास्त काळ स्वच्छ ठेवण्यासाठी काय कराल?

  • गादीला वास येऊ लागल्यानंतरच तिची स्वच्छता करावी असं नाही. काही छोट्या सवयी लावून घेतल्यास गादी जास्त काळ स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत ठेवता येते.

  • महिन्यातून किमान एकदा गादी व्हॅक्यूम क्लिनरने स्वच्छ करा.

  • गादीवर कोणताही डाग पडल्यास तो लगेच स्वच्छ करा.

  • गादीवर धुवून पुन्हा वापरता येणारे मॅट्रेस प्रोटेक्टर वापरा. यामुळे घाम, धूळ आणि इतर द्रव पदार्थ थेट गादीपर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यास मदत होते.

  • गादीवर अंथरलेली चादर नियमितपणे धुवा.

  • गादी फिरवण्याची सुविधा उत्पादकाने दिली असेल, तर दर तीन ते सहा महिन्यांनी ती फिरवा. यामुळे गादीवर एकाच ठिकाणी सतत दाब पडत नाही.

गादी स्वच्छ ठेवण्यासाठी खूप मेहनत घेण्याची गरज नाही. महिन्यातून एकदा व्हॅक्यूम करणं, वास येत असल्यास बेकिंग सोडा वापरणं, डाग पडताच स्वच्छ करणं आणि गादीला वेळोवेळी मोकळी हवा देणं एवढ्या साध्या गोष्टी केल्यास गादी जास्त काळ स्वच्छ आणि ताजी राहू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Factories: सहकारी साखर कारखान्यांसाठी खुशखबर, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; १३ सदस्यांची समिती स्थापन

Maharashtra News Live Update: रिक्षा टॅक्सी चालक-मालक सेनेची पार्श्वभूमी सांगत प्रताप सरनाईक यांची भूमिका

१०० व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळे; पुण्यात होणार शतकमहोत्सवी संमेलन

Salt Vastu Tips: तुमच्या किचनमध्ये मीठ कोणत्या दिशेला ठेवलंय? वास्तूशास्त्रात सांगितलीये योग्य दिशा

Pashudhan Yojana: शेळीपालन, दुग्धव्यवसायासाठी सरकारी अनुदान! पशुधन योजनेचा अर्ज 26 नोव्हेंबरपासून सुरू; आधीच तयार ठेवा ही 8 कागदपत्रे

SCROLL FOR NEXT