Ganesh Chaturthi 2022 : माझा बाप्पा किती गोड दिसतो..! गणपतीची चाहूल लागली की, आपले डोळे हे बाप्पाच्या आगमनासाठी आसूलेले असतात. कधी एकदा गणपती आपल्या घरी येतात व आपण त्याची मनोभावे पूजा करतो असे आपल्याला वाटत असते.
या दहा दिवसाच्या काळात गणपतीला आपण गोडाचा नैवेद्य दाखवतो. गणपतीला प्रिय असणारे सर्व पदार्थ त्याच्या पुढ्यात ठेवतो. या दिवसात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी देखील बनवतो.
श्रीगणेशाला प्रसन्न करण्यासाठी आपण नाना प्रकारच्या मोदकाचा नैवेद्य आपण त्याला दाखवतो. याआधी आपण मोदकाचे बरेच प्रकार बनवले असतील उकडीचे मोदक, रवा मोदक, मावा मोदक, काजू मोदक, पनीर मोदक आणि बरेच काही.
रोज बाप्पासाठी मोदकाचे वेगवेगळे प्रकार आपण बनवतो, त्याचसाठीच आज आपण बेसन आणि नारळाचे मोदक करतोय. पाक करून बनवलेले ही मोदक अगदी १५ ते २० दिवस आरामात टिकतात. अगदी पेढ्यासारखे खुसखुशीत होतात. जाणून घेऊया त्याची रेसिपी
साहित्य :-
साजूक तूप- १/२ वाटी
बेसन - २ वाटी
सुक्या नारळाचा किस - १ वाटी
साखर- ११/४ वाटी
पाणी - १/२ कप
वेलची पावडर- १/४ चमचा
केशर- १० ते १२ काड्या
ड्रायफ्रूट्स
कृती -
१. सर्वप्रथम तूपातले दोन चमचे तूप बाजूला काढून घ्या. गॅसवर कढई ठेवून त्याच उर्वरित तूप घाला व ते चांगले गरम झाल्यानंतर कढई गोलाकारात फिरवून घ्या.
२. त्यानंतर मंद आचेवर बेसन चांगले भाजून घ्या. तूप कमी पडल्यास उर्वरित तूप घाला. बेसन कोरडे दिसू लागल्यावर पुन्हा त्यात तूप घाला व चांगले परतवून घ्या.
३. बेसनाला लालसर रंग आल्यानंतर त्यात सुके खोबरे घाला. मिश्रण चांगले परतवून घ्या. गॅस बंद करुन त्याला एका प्लेटमध्ये पसरवून घ्या.
४. मिश्रण थंड होण्यास ठेवा. त्यानंतर कढई मंद आचेवर ठेवून त्यात सव्वा कप साखर (Sugar) घाला व त्यात अर्धा कप पाणी (Water)घाला. गॅस थोडा फास्ट करुन साखर विरघळवून घ्या.
५. गॅस मध्यम आचेवर ठेवून एकतारी पाक तयार करुन घ्या. पाक घट्ट झाल्यानंतर त्याला बोटाच्या सहाय्याने तपासून पहा.
६. तयार पाकात पाव चमचा वेलची पूड, केशर काड्या घालून ते चांगले मिक्स करा. गॅस मध्यम आचेवर ठेवून त्यात तयार केलेले बेसनाचे मिश्रण घाला.
७. मिश्रणाला चांगले एकजीव करा. २ ते ३ मिनिटांनंतर मिश्रण पाक सोडू लागल्यास ते तयार झाले असे समजावे. मिश्रण ताटात काढून त्याला थंड होऊ द्या.
८. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याला मोदकाच्या सारणात भरा किंवा हाताने वळवा. वरुन ड्रायफ्रुट्सने सजवा तयार होतील बेसन-नारळाचे मोदक.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.