उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळा पुन्हा सुरू झाल्या असून त्याचवेळी पावसाळाही जोर धरतोय. या दोन्ही गोष्टींचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर दिसून येत असून सर्दी, खोकला, व्हायरल ताप आणि इतर संसर्गजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या परिस्थितीला आरोग्य तज्ज्ञ 'स्कूल रीओपनिंग इफेक्ट' (School Reopening Effect) असं म्हणतात.
उन्हाळी सुट्टीनंतर मुलं पुन्हा शाळांमध्ये एकत्र येतात. त्यामुळे विषाणू आणि जीवाणूंचा प्रसार अधिक वेगाने होण्याची शक्यता वाढते. याशिवाय पावसाळ्यातील दमट वातावरणही संसर्गजन्य आजारांना पोषक ठरत असल्याने मुलांना संसर्ग होण्याचा धोका अधिक वाढतो.
मुंबईतील नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या बालरोग विभागाच्या सल्लागार डॉ. नेहल शाह यांनी सांगितलं की, शाळांमधील वर्ग खोल्या, बाकं, खेळणी तसंच इतर वस्तूंच्या सततच्या वापरामुळे संसर्गाचा प्रसार सहज होऊ शकतो. तसंच पावसामुळे साचलेल्या पाण्यात डासांची पैदास वाढत असल्याने डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनिया यांसारख्या डासांमुळे होणाऱ्या आजारांचाही धोका वाढतो.
या काळात मुलांमध्ये व्हायरल ताप, फ्लू, ब्राँकायटिस, श्वसनसंस्थेचे संसर्ग तसंच दूषित अन्न आणि पाण्यामुळे होणारे पोटाचे विकार मोठ्या प्रमाणात आढळतात. सुट्ट्यांदरम्यान बदललेली दिनचर्या, अपुरी झोप आणि असंतुलित आहार यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे संसर्गाचा धोका आणखी वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलंय.
डॉ. शाह यांच्या मते, नियमित हात धुण्याची सवय लावणे, खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक झाकणे, मूल आजारी असल्यास त्याला शाळेत न पाठवणं, संतुलित आहार देणं, पुरेशी झोप मिळेल याची काळजी घेणं आणि वेळेवर लसीकरण करणं या साध्या उपायांनी अनेक संसर्गजन्य आजारांपासून मुलांचे संरक्षण करता येतं. यासोबतच शाळांनीही परिसराची स्वच्छता आणि नियमित निर्जंतुकीकरणावर विशेष भर देण्याची गरज आहे.
मुलाला सतत ताप येणं, श्वास घेण्यास त्रास होणं किंवा दीर्घकाळ पोटदुखीची तक्रार असल्यास वेळ न दवडता बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन डॉ. नेहल शाह यांनी केलं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.