चांगले आरोग्य राखण्यासाठी फक्त संतुलित आहार आणि व्यायाम पुरेसे नाही, तर नियमित आणि गुणवत्तापूर्ण झोपही तितकीच गरजेची आहे. संशोधनानुसार प्रौढांनी दररोज ७ ते ९ तास झोप घेणे आवश्यक असते. पण जर तुम्ही दररोज ८ तास झोपत असाल तरीही थकवा, आळस आणि शारीरिक जडपणा जाणवत असेल, तर त्यामागे अन्य आरोग्यविषयक कारणं असण्याची शक्यता असते.
तुम्ही कधी विचार केला आहे का की रात्री ८ तास झोपूनही शरीर थकल्यासारखं का वाटतं? ही समस्या फक्त तुमची नाही, तर जगभरातील लाखो लोक अशाच अनुभवातून जात आहेत. आता या अशा झोपेनंतरही थकवा जाणवण्यामागची कारणं समजून घेऊया.
हार्मोन असंतुलन
शरीरातील हार्मोन्स सर्व कार्य नियंत्रित करतात आणि त्यांच्यात असंतुलन निर्माण झाल्यास थकवा व आळस वाटू शकतो. विशेषतः कोर्टिसोल आणि मेलाटोनिन या संप्रेरकांमधील बिघाडामुळे झोपेची गुणवत्ता खराब होते. त्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो आणि शरीरातील नैसर्गिक ऊर्जा कमी होते, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरते.
इलेक्ट्रोलाइटची कमतरता
मॅग्नेशियम, सोडियम आणि पोटॅशियम हे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स झोपेची गुणवत्ता आणि शरीराच्या पुनर्बलनात महत्त्वाची भूमिका बजावतात. या खनिजांची कमतरता असल्यास झोपमोड होते, वारंवार जाग येते आणि गाढ झोप होत नाही. परिणामी दिवसभर थकवा, अशक्तपणा आणि आळस जाणवतो, जो आरोग्यास घातक ठरू शकतो.