इरेक्टाइल डिसफंक्शन ही पुरुषांमध्ये आढळणारी एक समस्या आहे. ज्यामध्ये शारीरिक संबंधांच्या वेळी लिंगामध्ये इरेक्शन येत नाही. ही समस्या तरुणांमध्ये झपाट्याने वाढतेय. यामागे अनेक शारीरिक कारणं जबाबदार मानली जातात.
अलीकडे जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, इरेक्टाइल डिसफंक्शन हे पुरुषांमधील मधुमेहाचं सुरुवातीचं लक्षण असू शकते. या अभ्यासानुसार, इरेक्टाइल डिसफंक्शनने पीडित असलेल्या पुरुषांमध्ये 34 टक्क्यांपर्यंत प्रीडायबिटीज आणि टाइप 2 डायबिटीजचा धोका आढळतो. पूर्वी ही समस्या फक्त वृद्ध पुरूषांमध्ये आढळून येत होती. परंतु, आता ३० ते ४५ वयोगटातील तरुण पुरूषांमध्येही इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या दिसून येतेय.
इरेक्टाइल डिसफंक्शन ही फक्त लैंगिक समस्या नाही. ती शरीरात सुरू असलेल्या डायबिटीजचं सुरुवातीचे संकेत असू शकतात. रक्तातील साखर वाढल्याने रक्तवाहिन्या आणि नसांचं नुकसान होतं, ज्यामुळे इरेक्शन टिकत नाही. डायबिटीजमुळे शरीरातील नसांवर आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. ज्यामुळे लैंगिक उत्तेजना किंवा इरेक्शन राखण्यास अडचण येते. हाच परिणाम मूत्रविकार नियंत्रण, मूत्राशयाची कार्यक्षमता आणि मूत्रपिंडांच्या आरोग्यावरही होतो. ज्यामुळे पुरुषांच्या एकूण आरोग्यावर परिणाम दिसून येतो. त्यामुळे वेळेत उपचार घेणं आवश्यक आहे.
पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील युरोलॉजिस्ट डॉ. आदित्य देशपांडे म्हणाले की, “इरेक्टाइल डिसफंक्शन असलेल्या पुरुषांना लैंगिक संबंधासाठी पुरेसं इरेक्शन मिळवणं किंवा टिकवणं कठीण जाते. काहींना लैंगिक इच्छेत घट, इरेक्शन कमी वेळ टिकणं, लैंगिक कार्याबद्दल चिंता आणि ताण जाणवू शकतो. अनेक पुरुष लाजेमुळे ही समस्या लपवतात, पण वेळेत वैद्यकीय सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे.
डायबिटीज नियंत्रणात ठेवून, जीवनशैलीत सुधारणा करून आणि योग्य उपचार घेऊन इरेक्टाइल डिसफंक्शन मध्ये सुधारणा करता येते आणि गंभीर समस्या टाळता येतात. अनेक वेळा इरेक्टाइल डिसफंक्शन हे डायबिटीजचे पहिले दिसणारे लक्षण असतं. रक्तातील साखर दीर्घकाळ वाढलेली राहिल्यास रक्ताभिसरण कमी होतं आणि लैंगिक कार्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या सूक्ष्म नसांचं नुकसान होतं, असंही देशपांडे यांनी सांगितलं.
सतत इरेक्टाइल डिसफंक्शन जाणवत असल्यास पुरुषांनी ते दुर्लक्षित न करता डायबिटीजची तपासणी करावी. सुमारे २०% इरेक्टाइल डिसफंक्शन असलेल्या पुरुषांना डायबिटीज असल्याचे आढळते. महिन्यात ३०-४५ वयोगटातील १० पैकी २ पुरुष इरेक्टाइल डिसफंक्शन आणि डायबिटीजसह येतात. डायबिटीज लवकर ओळखून साखर नियंत्रणात ठेवली, तर मोठ्या गुंतागुंती टाळता येतात, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
डॉ. देशपांडे यांच्या सांगण्यानुसार, “पुरुषांनी इरेक्टाइल डिसफंक्शन बद्दल डॉक्टरांशी बोलताना लाज बाळगू नये. वेळेत उपचार घेतल्याने आत्मविश्वास वाढतो आणि डायबिटीज लवकर ओळखता येतो. डायबिटीजची काही सामान्य लक्षणे म्हणजे जास्त तहान लागणं, वारंवार लघवी होणं, थकवा, वजन घटणं, जखमा हळूहळू बऱ्या होणे आणि दृष्टी धूसर होणे.
इरेक्टाइल डिसफंक्शनसाठी स्वतःहून औषधे घेणं योग्य नाही. कारण त्यामुळे मूळ कारणाचा उपचार लांबतो. त्याऐवजी पुरुषांनी आरोग्यदायी सवयी जोपासल्या पाहिजेत. जसं की, संतुलित आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा, धूम्रपान सोडावं आणि तणाव कमी करावा. या गोष्टी डायबिटीज नियंत्रणात ठेवण्यास आणि लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.