Leftover Rice Benefits: भारतीय जेवणामध्ये भात हा महत्वाचा असतो. अनेक घरांमध्ये रात्री उरलेला भात सकाळी नाश्त्यासाठी किंवा जेवणासोबत खाल्ला जातो. भाताला फोडणी देऊन स्वादिष्ट फोडणीचा भात तयार करतात. मात्र, रात्रीचा शिळा भात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की त्यामुळे शरीराला नुकसान होऊ शकते, असा प्रश्न अनेकांना पडतो. चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
शिजवलेला भात थंड केल्यानंतर त्यामध्ये रेसिस्टंट स्टार्चचे प्रमाण वाढू शकते. हा स्टार्च पूर्णपणे पचत नाही. त्यामुळे तो आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांसाठी उपयुक्त ठरू शकतो. यामुळे, पचनसंस्थेच्या आरोग्याला मदत होण्याची शक्यता असते. शिळ्या भाताचा आणखी एक फायदा म्हणजे रक्तातील साखरेवर होणारा परिणाम. भात थंड केल्यानंतर त्यातील रेसिस्टंट स्टार्च वाढल्यामुळे काही प्रमाणात रक्तातील साखरेची वाढ नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते. मात्र, मधुमेह असलेल्या व्यक्तींनी शिळा भात खाल्ल्याने रक्तातील साखर वाढणार नाही, असे समजू नये.
दरम्यान, शिळा भात खाताना त्याच्या रात्रभर ठेवताना विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. शिजवलेल्या भातामध्ये 'बॅसिलस सेरियस' (Bacillus cereus) नावाचे बॅक्टेरिया वाढू शकतात. भात बराच वेळ खोलीच्या तापमानावर ठेवल्यास या बॅक्टेरियांची वाढ होऊन विषारी पदार्थ तयार होऊ शकतात. यामुळे उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होण्याची शक्यता असते. रात्रीचा भात सकाळी खायचा असल्यास तो रात्रभर बाहेर ठेवू नका. भात शिजल्यानंतर शक्य तितक्या लवकर फ्रिजमध्ये ठेवावा. खोलीच्या तापमानावर दोन तासांपेक्षा जास्त वेळ भात ठेवणे टाळावे. विशेषतः उन्हाळ्यात याबाबत अधिक काळजी घ्यावी.
फ्रिजमध्ये ठेवलेला भात खाताना तो व्यवस्थित गरम करावा. भाताच्या सर्व भागांतून वाफ येईपर्यंत तो गरम होणे महत्त्वाचे आहे. शक्यतो भात पुन्हा पुन्हा गरम करू नये. कारण योग्य प्रकारे गरम केल्याने काही जिवाणू नष्ट होऊ शकतात; मात्र आधीच तयार झालेले काही विषारी पदार्थ नष्ट होतीलच असे नाही. लहान मुले, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी शिळा भात खाताना विशेष काळजी घ्यावी. भाताचा वास किंवा चव नीट असेल तरच तो खावा.