हार्ट अटॅकचा धोका आता वृद्धांमध्येच नाहीतर, तरुणांमध्ये आणि महिलांमध्येही वाढताना दिसतो. तज्ज्ञांनी केलेल्या चाचणीनुसार अमेरिकेत सुमारे ६ कोटी महिलांना हार्ट अटॅकचा त्रास आहे. २०२३ मध्येच ३ लाखांहून अधिक महिलांचा मृत्यू हार्ट अटॅकचामुळे झाला. म्हणजे प्रत्येक पाच मृत्यूंपैकी एक मृत्यू हा हार्ट अटॅकमुळे होत आहे. तरीदेखील केवळ ५६ टक्के अमेरिकन महिलांना हृदयरोग हा त्यांचा सर्वात मोठा जीवघेणा शत्रू आहे याची जाणीव आहे, असे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या २०२४ च्या अहवालात म्हटले आहे. याची सुरुवातीची आणि महिलांमध्ये दिसणारी लक्षणे ही सामान्य वाटतात मात्र ती तशी नसतात.
जवळपास सगळ्याच महिला आपल्या कुटुंबीयांच्या जबाबदाऱ्यांमध्ये, कामांच्या व्यापात इतक्या गुंतलेल्या असतात की स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेकदा हार्ट अटॅकची लक्षणे किंवा अगदी हार्ट अटॅकची चिन्हेसुद्धा दुर्लक्षित होतात. अलीकडेच डॉ. कुनाल सूद, हे डबल बोर्ड-प्रमाणित एमडी आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असलेले हृदयरोगतज्ज्ञ, यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्यांनी महिलांमध्ये हार्ट अटॅकची चार सूक्ष्म लक्षणे सांगितली आहेत.
पहिलं महत्त्वाचं लक्षण म्हणजे छातीत अचानक चमकतं किंवा दुखायला सुरुवात होते. हे दुखणं मध्यभागी जाणवतं आणि अनेकदा छातीत श्वास कोंडल्यासारखं वाटतं. दुसरं म्हणजे छातीपुरतंच नाही तर शरीराच्या इतर भागांत जसं की हात, पाठ, मान, तोंड किंवा अगदी पोटामध्ये होणारी वेदना हृदयाच्या समस्येची लक्षणे असू शकतात. तिसरं लक्षण म्हणजे श्वास घेताना त्रास होणे. ही वेदना छातीत दुखण्यासोबत किंवा वेगळंही दिसून येऊ शकते. चौथं म्हणजे थंड घाम येणे, मळमळणे किंवा गरगरणे. ही लक्षणे सामान्यतः फ्लू किंवा अॅसिडिटीसारखी वाटतात आणि त्यामुळे महिला त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत.
तज्ज्ञांच्या मते, अनेक महिलांना ही लक्षणे अगदी किरकोळ किंवा वय वाढल्यामुळे निर्माण झाली आहेत असं वाटतं. पण प्रत्यक्षात ही हार्ट अटॅक येण्यापूर्वीची गंभीर इशारे आहेत. नॅशनल हार्ट, लंग अँड ब्लड इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार, महिलांमध्ये हार्ट अटॅकदरम्यान खांदा, पाठ किंवा हात दुखणे, श्वास लागणे, अनपेक्षित थकवा, पोटदुखी आणि चिंतेची भावना ही सामान्य लक्षणे दिसून येतात. त्यामुळे आपल्या शरीराने दिलेले संकेत कधीही दुर्लक्षित करू नयेत आणि वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.