Walking for Diabetes saam tv
लाईफस्टाईल

Walking for Diabetes: चालल्याने ब्लड शुगर कंट्रोल होण्यास मदत होते? डॉक्टरांनी सांगितलं कोणत्या वेळी चालणं ठरेल फायदेशीर

Blood Sugar Control: नियमित चालल्याने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते का? जेवणानंतर १० ते १५ मिनिटे चालण्याचे फायदे काय? मधुमेहाच्या रुग्णांनी चालण्यासाठी कोणती वेळ निवडावी आणि कोणती काळजी घ्यावी हे जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

पायी चालणं हा आरोग्यासाठी अतिशय चांगला व्यायाम मानला जातो. नियमित चालण्यामुळे वजन कमी करण्यासोबतच शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यासही मदत होते. पण चालण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी म्हणजेच ब्लड शुगर नियंत्रणात ठेवता येते का, असा प्रश्न अनेकांना पडतो. मधुमेह असलेल्या लोकांसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

याबाबत नोएडाच्या फोर्टिस रूग्णालयातील एंडोक्राइनोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अनुपम बिस्वास यांनी महत्त्वाची माहिती दिलीये. चालण्याचे फायदे काय आहेत आणि चालण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे हे त्यांनी सांगितलंय.

चालण्यामुळे ब्लड शुगर कशी कमी होते?

डॉक्टरांच्या मते, रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी चालणं हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. आपण ज्यावेळी पायी चालतो तेव्हा आपल्या स्नायूंना काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा मिळवण्यासाठी शरीर रक्तातील ग्लुकोजचा वापर करते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते.

नियमित चालण्याचा आणखी एक फायदा म्हणजे शरीराची इन्सुलिन वापरण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते. इन्सुलिनमुळे रक्तातील ग्लुकोज शरीराच्या पेशींपर्यंत पोहोचण्यास मदत होते. नियमित चालल्याने शरीर इन्सुलिनचा अधिक चांगल्या प्रकारे वापर करू लागते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणं अधिक सोपं होतं.

चालण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे?

चालण्यासाठी सकाळची वेळच योग्य असते असं नाही. जेवणानंतर थोडा वेळ चालणंही तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. दुपारचं किंवा रात्रीचे जेवण झाल्यानंतर १० ते १५ मिनिटं हलक्या किंवा मध्यम गतीने चालल्यास जेवणानंतर वाढणारी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. दिवसभर ऑफिसमध्ये किंवा घरी एकाच जागी बसून काम करणाऱ्या लोकांसाठी रात्रीच्या जेवणानंतर चालणं हा चांगला पर्याय आहे.

असं असलं तरी सकाळी चालण्याचेही अनेक फायदे आहेत. सकाळी चालल्याने हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यास, वजन नियंत्रणात ठेवण्यास आणि शरीराची इन्सुलिन वापरण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते.

दिवसभर थोडं थोडं चालणंही महत्त्वाचं

एकाच वेळी खूप वेळ चालण्यापेक्षा दिवसभर शरीराची हालचाल सुरू ठेवणं गरजेचं आहे. सुरुवातीला रोज १० ते १५ मिनिटं चालण्यापासून सुरुवात करू शकता. त्यानंतर हळूहळू चालण्याचा वेळ वाढवावा. आठवड्यातून किमान १५० मिनिटं मध्यम गतीने चालणं किंवा इतर शारीरिक हालचाली करण्याचे ध्येय ठेवावं, असा सल्ला डॉक्टर देतात.

मधुमेहाच्या रुग्णांनी चालताना कोणती काळजी घ्यावी?

मधुमेह असलेल्या लोकांनी चालण्याची सवय लावताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जे लोक इन्सुलिन किंवा रक्तातील साखर कमी करणारी औषधे घेतात, त्यांनी विशेष काळजी घ्यावी. चालताना रक्तातील साखर खूप कमी होण्याचा धोका असू शकतो. या स्थितीला हायपोग्लायसेमिया म्हणतात. त्यामुळे चालण्याची वेळ आणि व्यायामाचे प्रमाण ठरवताना आपल्या आरोग्याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Ladki Bahin Yojana : सप्टेंबर महिन्याचे ₹1500 जमा होण्यास सुरूवात, तुमच्या खात्यात पैसे झाले का जमा?

Maharashtra News Live Update : श्वास घेताना छातीत वेदना होत असल्याने शरद पवार यांच्यावर उपचार सुरू

Maharashtra Drought : सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील ३ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार, २९१ कोटींचा निधी मंजूर

Raigad Fort : रायगड किल्ल्याची 'ही' ५ वैशिष्ट्ये तुम्हाला माहितेय का? तिसरे वाचून थक्क व्हाल

Bigg Boss 20 : बिग बॉसच्या घरात नॉमिनेशनचा भडका; सदस्यांचा एकमेकांवर पलटवार, ६ जणांवर टांगती तलवार

SCROLL FOR NEXT