Child health saam tv
लाईफस्टाईल

Child health: वयाच्या तिसऱ्या वर्षापासून दमा-टीबी अन् न्यूमोनियाचे उपचार, ७ वर्षानंतर सत्य आलं समोर, डॉक्टरही हादरले

सततचा खोकला, न्यूमोनिया, टीबी आणि दम्याचे उपचार घेत असलेल्या 10 वर्षीय मुलीच्या श्वासनलिकेत सात वर्षांपासून पेनचं झाकण अडकल्याचं ब्रॉन्कोस्कोपीत उघड झालं. डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्यावर उपचार केले.

Surabhi Jayashree Jagdish

सततचा खोकला, वारंवार ताप, न्यूमोनिया, टीबी आणि दम्याचे उपचार... तब्बल सात वर्षे एका १० वर्षांच्या मुलीवर वेगवेगळ्या आजारांवर उपचार सुरू होते. मात्र, या सगळ्यामागचं खरं कारण समोर आलं तेव्हा डॉक्टरही चकित झाले. तपासणीत तिच्या श्वासनलिकेत लहानपणापासूनच पेनचे झाकण अडकून बसल्याचं आढळलं.

या झाकणामुळे तिच्या डाव्या फुफ्फुसाच्या खालच्या भागाचं मोठं नुकसान झालं होतं. अखेर मुंबईतील महालक्ष्मीच्या नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ब्रॉन्कोस्कोपी आणि शस्त्रक्रिया तिच्या प्रकृतीत सुधारणा केलीये.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी साडेतीन वर्षांची असल्यापासून सतत खोकत होती. तिला वारंवार ताप येत होता, भूक लागत नव्हती आणि तिचे वजनही वाढत नव्हतं. सुरुवातीच्या तपासण्यांमध्ये टीबीचा संशय आल्याने तिच्यावर त्याचे उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचार करूनही तिच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही.

यानंतर डॉक्टरांनी तिला दमा असल्याचं निदान केलं आणि इनहेलर वापरण्याचा सल्ला दिला. तरीही तिचा त्रास कमी झाला नाही. सततचा खोकला आणि वारंवार होणारा फुफ्फुसाचा संसर्ग सुरूच राहिल्याने अखेर तिला मुंबईतील महालक्ष्मीच्या एका मोठ्या रूग्णालयात दाखल करण्यात आला.

नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार डॉ. इंदू खोसला यांनी सांगितलं की, एखाद्या मुलाला बराच काळ सतत खोकला येत असेल फुफ्फुसात वारंवार संसर्ग होत असेल किंवा फुफ्फुसाच्या एकाच भागात पुन्हा-पुन्हा समस्या निर्माण होत असतील तर श्वसनलिकेत एखादी बाहेरील वस्तू अडकली आहे का याची तपासणी करणं आवश्यक असतं.

मुलीच्या सीटी स्कॅनमध्ये तिच्या डाव्या फुफ्फुसाच्या खालच्या भागाला गंभीर इजा झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर डॉक्टरांनी ब्रॉन्कोस्कोपी केली. या तपासणीत अनेक वर्षांपासून तिच्या श्वासनलिकेत पेनचं झाकण अडकलं असल्याचं दिसून आलं.

डॉक्टरांनी ब्रॉन्कोस्कोपीद्वारे हे झाकण यशस्वीरित्या बाहेर काढलं. मात्र, इतकी वर्षे ते श्वासनलिकेत अडकल्यामुळे डाव्या फुफ्फुसाच्या खालच्या भागाचं कायमस्वरूपी नुकसान झालं होतं. पुढे संसर्गाचा धोका टाळण्यासाठी डॉक्टरांनी थोरॅकोस्कोपिक लेफ्ट लोअर लोबेक्टॉमी ही शस्त्रक्रिया करून फुफ्फुसाचा खराब झालेला भाग काढून टाकला.

डॉक्टरांच्या मते, मुलांमध्ये सतत खोकला, वारंवार न्यूमोनिया किंवा एकाच ठिकाणी पुन्हा-पुन्हा फुफ्फुसाचा संसर्ग होत असेल तर केवळ टीबी किंवा दमाचाच विचार न करता श्वसनलिकेत एखादी वस्तू अडकली आहे का, याचीही तपासणी करणं गरजेचं आहे. योग्य वेळी निदान झाल्यास गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT