आपल्यापैकी जवळपास प्रत्येक जण आजकाल नोकरी करतो. रोजची डेडलाईन, कामाचा ताण यामुळे कर्मचारी मानसिक आजाराचे बळी पडत असल्याचं समोर आलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच पुण्यामध्ये एका तरूणीचा कामाच्या ताणामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीमध्ये रुजू झाल्यानंतर अवघ्या ४ महिन्यातच या तरुणीचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत मानसिक आरोग्य जपणं किती महत्त्वाचं आहे, याबाबत तज्ज्ञांनी आपल्याला माहिती दिलीये.
पुण्यातील ही घटना घडल्यानंतर देशात अजून एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये ऑफिसमध्येच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने महिला कर्मचारीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गेल्या महिन्यात बंगळूरूच्या एका हेल्थकेअर कंपनीने कर्मचाऱ्यांची भावनात्मक आरोग्य स्थिती जाणून घेण्यासाठी एक सर्व्हे केला. यामधून २१ ते ३० वयोगातील कर्मचारी अधिक तणावग्रस्त असल्याचं समोर आलं.
सर्वेक्षणानुसार, ३० ते ४० वयोगटातील लोक आणि त्यानंतर ४१ ते ५० वयोगटातील लोक दुसऱ्या क्रमांकावर तणावग्रस्त कर्मचारी असल्याचं लक्षात आलं. याशिवाय कामाच्या ठिकाणी पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक तणावाचा सामना करावा लागतो, असंही आढळून आलं. यामध्ये जवळपास 72.2 टक्के महिलांनी हाय टेन्शन असल्याची नोंद केली. त्या तुलनेमध्ये, जेव्हा पुरुषांना हाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांच्यापैकी 53.64 टक्के लोकांनी सांगितलं की त्यांना अधिक ताणाचा सामना करावा लागतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दरम्यान सध्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये वर्कलोडचं प्रमाण वाढलं आहे. अशा परिस्थिती मानसिक आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. यावेळी वर्कलोड मॅनेजमेंट कसं करावं याबाबत डॉक्टरांनी आपल्याला माहिती दिली आहे.
कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. यावेळी अधिक ताणताणावाचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतोडॉ. प्रशांत चौधरी, मानसोपचारतज्ज्ञ
मुंबईच्या वांद्रे परिसरातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रशांत चौधरी यांनी सांगितलं की, मुळात प्रत्येकाने वर्कलोडमुळे मासनिक आरोग्य धोक्यात येतं, ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. सध्याच्या ऑफिसेसमध्ये कामाच्या कल्चरमुळे प्रोजेक्टच्या डेडलाईन, कामाचं प्रमाण यांच्यामध्ये वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीने आणि कंपनीने देखील एखाद्या व्यक्तीची कामाची किती कॅपेसिटी आहे हे पाहिणं गरजेचं आहे. जर जास्त प्रमाणात काम झालं तर त्यामुळे ताण येऊ शकतो, परिणामी काही दिवसांनी ताणाचं प्रमाण अधिक झालं की त्याचे विपरीत परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात.
जर ऑफिसमध्ये वर्कलोडचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून आलं तर, कंपनीने एक काऊंसिलर अपॉईंट करणं फायदेशीर ठरू शकतं. अशावेळी ज्या कर्माचाऱ्याला त्रास होत असेल तो या काऊंसिलरची मदत घेऊन ताणा-तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करेल. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांनी त्यांच्या परीने मानसिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. यामध्ये पुरेशा प्रमाणात झोप, योग्य आहार आणि व्यायाम करणं गरजेचं आहे, असंही डॉ. चौधरी यांनी म्हटलं आहे.
डॉक्टरांच्या सांगण्यांनुसार, दररोज जवळपास ३०-३५ टक्के रग्ण हे कामाच्या ठिकाणी त्रास किंवा ताण यांच्यामुळे आलेले असतात. यामध्ये काहींना वर्कलोड, सहकाऱ्यांचा त्रास, वरिष्ठांचा जाच यांचा सामना करावा लागतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.