आपण कोलेस्ट्रॉलची चाचणी करून घेतल्यानंतर बहुतेक जण सर्वप्रथम एकच गोष्ट पाहतात ती म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलं आहे का, की ते नॉर्मल आहे? पण हृदयाच्या तज्ज्ञांच्या मते, फक्त एकूण कोलेस्ट्रॉल पाहून हृदयाच्या आरोग्याचा योग्य अंदाज येत नाही. त्याऐवजी कोलेस्ट्रॉल रेशो (Cholesterol Ratio) हा आकडा अधिक महत्त्वाचा मानला जातो. हा रेशो शरीरात चांगल्या आणि वाईट कोलेस्ट्रॉलचं संतुलन कसं आहे, हे दाखवतो आणि त्यामुळे भविष्यात हार्ट अटॅकचा धोका किती असू शकतो याचा अंदाज डॉक्टरांना अधिक अचूकपणे येतो.
ब्रिटिश हार्ट फाउंडेशन (BHF)च्या मते, एखाद्या व्यक्तीचं फक्त कोलेस्ट्रॉल वाढलं आहे की नाही यावरून हृदयाच्या आजाराचा धोका ठरवता येत नाही. डॉक्टर त्यासोबत अनेक गोष्टींचा विचार करतात. यात व्यक्तीचं वय, रक्तदाब, धूम्रपानाची सवय, मधुमेह आहे का तसंच कुटुंबात हार्टचा इतिहास आहे का, याचाही समावेश असतो. या सर्व गोष्टी एकत्र पाहिल्यानंतरच भविष्यातील हार्ट अटॅकचा धोका ठरवला जातो.
कोलेस्ट्रॉल चाचणीमध्ये रक्तातील वेगवेगळ्या प्रकारच्या चरबीचं प्रमाण मोजलं जातं.
यामध्ये LDL (लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन) याला 'वाईट कोलेस्ट्रॉल' म्हटलं जातं. हे जास्त झाल्यास रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर चरबी साचू लागतं. कालांतराने हा थर वाढत जाऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो.
दुसरीकडे HDL (हाय-डेन्सिटी लिपोप्रोटीन) हे 'चांगलं कोलेस्ट्रॉल' मानलं जातं. हे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल परत यकृताकडे (लिव्हर) घेऊन जातं, जिथे त्याची विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचण्याचा धोका कमी होतो.
म्हणूनच डॉक्टर फक्त एकूण कोलेस्ट्रॉल न पाहता LDL आणि HDL यांच्यातील संतुलनालाही खूप महत्त्व देतात.
कोलेस्ट्रॉल रेशो काढण्याची पद्धत अगदी सोपी आहे.
एकूण कोलेस्ट्रॉल ÷ HDL कोलेस्ट्रॉल = कोलेस्ट्रॉल रेशो
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचं एकूण कोलेस्ट्रॉल 5.4 mmol/L आणि HDL 1.5 mmol/L असेल, तर त्याचा रेशो 3.6 येतो.
NHSच्या माहितीनुसार, हा रेशो जितका कमी असेल तितकं चांगलं मानलं जातं. मात्र हा आकडा एकटाच पाहिला जात नाही. इतर आरोग्याच्या घटकांसोबत त्याचं मूल्यांकन केलं जातं.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मते, रक्तात साचलेलं अतिरिक्त कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास HDL मदत करतं. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थर तयार होण्याचा धोका कमी होतो. तरीही फक्त HDL वाढवणं पुरेसं नाही. हृदय निरोगी ठेवण्यासाठी शरीरात चांगल्या आणि वाईट कोलेस्ट्रॉलचं योग्य संतुलन असणं अधिक महत्त्वाचं आहे.
काही दैनंदिन सवयींमुळे कोलेस्ट्रॉल रेशो बिघडू शकतो.
सॅच्युरेटेड फॅट जास्त असलेला आहार
धूम्रपान
लठ्ठपणा
शारीरिक हालचालींचा अभाव
नियंत्रणात नसलेला मधुमेह
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दीर्घकाळ टिकणाऱ्या चांगल्या सवयी बाळगणं गरजेचं आहे.
आहारात ओट्स, बीन्स, फळं आणि भरपूर भाज्यांचा समावेश करा.
फायबरयुक्त पदार्थ अधिक खा.
सॅच्युरेटेड फॅटऐवजी चांगल्या प्रकारचे अनसॅच्युरेटेड फॅट वापरा.
नियमित व्यायाम करा.
वजन नियंत्रणात ठेवा.
धूम्रपान पूर्णपणे सोडा.
मद्यपान कमी करा.
ज्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका अधिक असतो, त्यांना डॉक्टर जीवनशैलीतील बदलांसोबत कोलेस्ट्रॉल कमी करण्याची औषधंही देऊ शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.