महाराष्ट्राला गड-किल्ल्यांचा समृद्ध ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांपासून ते समुद्रकिनाऱ्यापर्यंत अनेक किल्ले आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. ठाणे परिसरालाही या वारशाची मोठी परंपरा लाभली आहे. हिवाळ्यात विकेंडला तुम्ही मित्रांसोबत, जोडीदारासोबत , कुटुंबासोबत किल्ल्यावर भटकंती करायला आवर्जून जा.
घोडबंदर किल्ला (मीरा-भाईंदर)
घोडबंदर किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक आहे. १६व्या शतकात पोर्तुगीजांनी या परिसरात आपले वर्चस्व निर्माण केले. घोडबंदर बंदरातून अरब व्यापाऱ्यांसोबत घोड्यांचा व्यापार होत असल्याने या भागाला ‘घोडबंदर’ हे नाव पडल्याचे सांगितले जाते.पोर्तुगीजांनी उंच टेकडीवर हा किल्ला उभारला. समुद्रमार्ग आणि खाडी परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होत असे.
दुर्गाडी किल्ला (कल्याण)
कल्याण शहरातील दुर्गाडी किल्ल्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. हा किल्ला उंच टेकडीवर असून त्याच्या परिसरातून उल्हास नदी आणि खाडीचा भाग दिसतो. ऐतिहासिक नोंदींनुसार, कल्याणच्या तटबंदीचा विकास मुघल काळात झाला. पुढे मराठ्यांनी कल्याणचा ताबा घेतल्यानंतर किल्ल्यात दुर्गादेवीचे मंदिर उभारले आणि त्याला ‘दुर्गाडी’ हे नाव मिळाले.खाडीमार्गावरील नियंत्रण आणि आरमाराच्या हालचालींसाठी हा परिसर उपयुक्त होता.
माहुली किल्ला (शहापूर)
माहुली किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे २,८१५ फूट उंचीवर असलेला हा किल्ला माहुली, भंडारगड आणि पळसगड अशा दुर्गसमूहासाठी ओळखला जातो.इतिहासात हा परिसर मुघलांच्या ताब्यात होता. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. किल्ल्यावर जाण्यासाठी डोंगरवाटेने ट्रेक करावा लागतो.
सिद्धगड (मुरबाड तालुका)
सिद्धगड हा मुरबाड परिसरातील डोंगरी किल्ला असून त्याचे स्थान सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे होते. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये उंचावर वसलेला हा किल्ला आसपासच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत असे.सिद्धगडाच्या परिसरात तटबंदीचे अवशेष, कातळवाटा आणि पाण्याची टाकी पाहायला मिळतात. या किल्ल्याचा ट्रेक तुलनेने आव्हानात्मक मानला जातो.
चंदेरी किल्ला (बदलापूर-अंबरनाथ)
चंदेरी किल्ला हा ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध डोंगरी किल्ल्यांपैकी एक आहे. उंच कातळकडा आणि अवघड चढाई यामुळे हा किल्ला गिर्यारोहकांमध्ये लोकप्रिय आहे. गडाचा माथा आणि त्याच्या सभोवतालचा डोंगराळ परिसर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे.चंदेरी किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी काही ठिकाणी खडकाळ आणि तीव्र चढाई करावी लागते.
वसई किल्ला (वसई, पालघर)
वसई किल्ला हा कोकण किनारपट्टीवरील महत्त्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे. पोर्तुगीजांनी या किल्ल्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला होता. १७३९ मध्ये चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दीर्घ संघर्षानंतर हा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. त्यामुळे मराठ्यांच्या इतिहासात या किल्ल्याला विशेष महत्त्व आहे.
अर्नाळा किल्ला (विरारजवळ)
अर्नाळा किल्ला हा समुद्रातील बेटावर बांधलेला जलदुर्ग आहे. समुद्रमार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी या किल्ल्याला सामरिक महत्त्व होते. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या या किल्ल्यावर पुढे मराठ्यांनी विजय मिळवला.किल्ल्याच्या तटबंदीला समुद्राच्या लाटांचा सतत सामना करावा लागतो. अर्नाळा गावातून बोटीने किल्ल्यावर जाता येते.
टीप : वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.