चार वर्ष सातत्याने निर्विवाद वर्चस्व गाजवत स्टार प्रवाह वाहिनी फक्त प्रेक्षकांच्या घराघरातच नाही तर मनामनातही पोहचली आहे. दर्जेदार मालिका आणि नवनव्या रिऍलिटी शोजच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीचा लोकप्रिय कार्यक्रम आता होऊ दे धिंगाणाचं तिसरं पर्व १६ नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. एनर्जेटिक सुपरस्टार आणि सर्वांचा लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज आहे. तिसऱ्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे यंदा धिंगाणा रंगणार आहे गावामध्ये अर्थात मुक्काम पोस्ट धिंगाणा बुद्रुक मध्ये. धिंगाणाच्या मंचावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कलाकार मंडळी येतात. त्यामुळे तिसऱ्या पर्वात धमाल-मस्तीसोबतच महाराष्ट्राच्या मातीतली विविधता नवनव्या टास्कच्या माध्यमातून धिंगाणाच्या मंचावर अनुभवता येणार आहे.
मागच्या पर्वात सुपरहिट ठरलेल्या साडे माडे शिंतोडे, बोबडी वळाली, धुऊन टाक, रेखाटा पटा पटा या फेऱ्या या पर्वातही असणार आहेत. याच्या सोबतीला गरागरा आणि भराभरा, डब्बा डब्बा उई उई, स्मायली काय गायली अश्या अतरंगी फेऱ्या देखिल असणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या दोन पर्वात ज्या फेरीची सर्वाधिक चर्चा रंगली त्या साडे माडे शिंतोडेचं नवं रुप या पर्वात पाहायला मिळेल. स्टार प्रवाहच्या परिवारातल्या कलाकार मंडळींसोबत यंदाचं पर्व नव्या जोशात रंगणार आहे. दोन मालिकांच्या टीममधली सांगितीक लढत प्रेक्षकांसाठी पर्वणी असेलच पण त्यासोबतच भन्नाट टास्क आणि कलाकारांच्या पडद्यामागच्या गमती-जमतीही या मंचावर उलगडतील.
अभिनेता सिद्धार्थ जाधव या नव्या पर्वासाठी अतिशय उत्सुक असून प्रेक्षकांप्रमाणेच मी सुद्धा या पर्वाची वाट पहात होतो अशी भावना सिद्धार्थने व्यक्त केली. आता होऊ दे धिंगाणाने टीआरपीचे नवनवे विक्रम रचले होते. हा कार्यक्रम जेव्हा संपला तेव्हा पुन्हा कधी सुरु होणार याची प्रेक्षकांकडून सातत्याने विचारणा होत होती. नवी ऊर्जा घेऊन हा कार्यक्रम लवकरच भेटीला येतोय. यंदाचा धिंगाणा हा तुमच्या आमच्या गावामध्ये नेणारा असेल. गावच्या चावडीवर बसून एखादा खेळ बघताना जी धमाल येते तीच धमाल हा कार्यक्रम पाहाताना येणार आहे. बरेच नवे टास्क यंदाच्या पर्वाचं वेगळेपण म्हणता येईल. म्हणजे यंदाच्या पर्वात म्युझिक आहे, मस्ती आहे आणि सोबतीला गावरान ठसकाही आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पहावा असा आता होऊ दे धिंगाणा ३ असणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीला फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर जगभरातून प्रेम मिळत आहे. या कुटुंबाचा भाग असल्याचा अतिशय आनंद आणि अभिमान आहे अश्या शब्दात सिद्धार्थ जाधवने आपली भावना व्यक्त केली.
तेव्हा सिद्धार्थ जाधवचा सळसळता उत्साह आणि प्रवाह परिवाराचा धिंगाणा एकत्र अनुभवायचा असेल तर आता होऊ दे धिंगाणाचं तिसरं पर्व पाहायलाच हवं. तेव्हा पाहायला विसरु नका स्टार प्रवाहचा हा अनोखा आणि भन्नाट कार्यक्रम ‘आता होऊ दे धिंगाणा ३’ १६ नोव्हेंबरपासून दर शनिवार आणि रविवार रात्री ९ वाजता भेटीला येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.