Punha Ekda Sade Made Teen: मराठी सिनेसृष्टीतील प्रेक्षकांच्या लाडक्या कुरळे बंधू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परत येत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणि अपेक्षा प्रचंड वाढवल्या आहेत. हा चित्रपट केवळ विनोदापुरता मर्यादित नसून शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या गोंधळाची आणि गैरसमजांची धमाल गोष्ट असल्याचे ट्रेलरवरून स्पष्ट होते.
ट्रेलरमध्ये रतन, मदन आणि चंदन यांच्या आयुष्यात सतत घडणाऱ्या विचित्र घटनांची झलक पाहायला मिळते. कधी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जाते, तर कधी गैरसमजांचा गुंता अधिकच वाढत जातो. या सगळ्यात बबनची खट्याळ एन्ट्री कथेला वेगळंच वळण देते. वेगवेगळ्या स्वभावांची माणसं एकत्र आली की काय गोंधळ उडतो, याचं उत्तम उदाहरण हा ट्रेलर देतो.
या गोंधळात अभिनेत्री रिंकू राजगुरूची एन्ट्री विशेष लक्ष वेधून घेते. ती नेमकी कोण आहे, ती त्यांच्या आयुष्यात का आली आणि तिच्या येण्यामुळे सगळेच इतके अस्वस्थ का झाले आहेत, याचं उत्तर ट्रेलर थेट देत नाही. त्यामुळे तिच्या भूमिकेबाबत कुतूहल अधिकच वाढतं. ही एन्ट्री योगायोग आहे की एखाद्या मोठ्या वळणाची सुरुवात, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणतात, “हा चित्रपट केवळ विनोद नाही, तर माणसांच्या स्वभावातून आणि अचानक घडणाऱ्या प्रसंगांतून तयार होणाऱ्या गोंधळाची धमाल गोष्ट आहे. ट्रेलरमध्ये दिसणाऱ्या मजेपेक्षा अनेक पटींनी मोठा अनुभव प्रेक्षकांना चित्रपटात मिळणार आहे.”
अंकुश चौधरी दिग्दर्शित या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव यांसारखे दिग्गज कलाकार असून संजय नार्वेकर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. छायाचित्रण संजय जाधव यांनी केले आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट येत्या ३० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.