Pakistani Series Ban in India: पाकिस्तानी कलाकार फवाद खान आणि माहिरा खान पुन्हा एकदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. 'जो बचे हैं संग समेट लो' (Jo Bache Hain Sang Samet Lo) या आगामी नेटफ्लिक्स सीरिजमध्ये ही जोडी पाहायला मिळणार आहे. मात्र, प्रदर्शनापूर्वीच ही सीरिज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 'ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन'ने (AICWA) या सीरिजच्या भारतातील प्रदर्शनाला विरोध केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाकिस्तानी कंटेन्टवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यामुळे ही सीरिज भारतात प्रदर्शित होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
AICWA ने पंतप्रधान मोदींकडे केली बंदीची मागणी
AICWA ने पाकिस्तानी मनोरंजन क्षेत्रातील कंटेन्टविरोधात भूमिका घेतली आहे. संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर शेअर केले आहे. नेटफ्लिक्स इंडियासह भारतातील सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाकिस्तानी चित्रपट, वेब सीरिज, गाणी आणि पॉडकास्ट प्रदर्शित करू नयेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच पाकिस्तानी कंटेन्टच्या प्रसारणावर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी कठोर कायदा करावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे. ४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणारी ही सीरिज भारतात रिलीज होऊ नये, अशी भूमिका AICWA ने मांडली आहे.
काय आहे सीरिजची कथा?
फरहत इश्तियाक यांच्या लोकप्रिय उर्दू कादंबरीवर ही सीरिज आधारित आहे. रोममध्ये राहणारा सिकंदर नावाचा पाकिस्तानी वकील या कथेचा हिरो आहे. एका वाईट अनुभवानंतर त्याला निद्रानाश आणि वाईट स्वप्नांचा त्रास होतो. त्याच्या आयुष्यात लिझा नावाच्या मुलीची एन्ट्री होते. त्यानंतर त्यांच्या नात्यातून प्रेम, कुटुंब आणि भूतकाळातील अनेक गोष्टी उलगडत जातात. या सीरिजमध्ये तीन पिढ्यांच्या सहा प्रेमकथा दाखवण्यात आल्या आहेत.
४ डिसेंबरला होणार सीरिज प्रदर्शित
'जो बचे हैं संग समेट लो' ही सीरिज ४ डिसेंबर २०२६ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. भारतात ही सीरिज 'ऑल द लव्ह अवर हार्ट्स कॅरी' या नावाने घोषित करण्यात आली आहे. मात्र, AICWA च्या विरोधानंतर भारतात तिचे प्रदर्शन होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे फवाद आणि माहिराच्या चाहत्यांना या सीरिजसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.