Marathi Movie: मराठी चित्रपटांना थिएटर न मिळाल्याच्या समस्या पुन्हा एकदा समोर आली आहे. अंबरनाथमधील मिराज सिनेमागृहाने ‘छबी’ या मराठी चित्रपटाचे शो अचानक कमी केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा संताप अनावर झाला आहे. प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाही हा निर्णय घेतल्याने मनसेने थेट सिनेमागृहावर धडक देत व्यवस्थापनाला कठोर इशारा दिला आहे.
मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्समध्ये योग्य स्क्रिन आणि वेळ मिळत नाही, याबाबतची नाराजी मनसेने यापूर्वीही अनेकदा व्यक्त केली आहे. मात्र ‘छबी’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असतानाच त्याचे शो कमी करण्यात आल्याने मनसेकडून तीव्र भूमिका घेण्यात आली. मनसेचे अंबरनाथ शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मिराज सिनेमागृहात जाऊन व्यवस्थापनाशी चर्चा केली आणि मराठी चित्रपटांविषयी होत असलेल्या भेदभावाबाबत निषेध नोंदवला.
मनसेच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, “मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळणं हे मराठी प्रेक्षकांचं हक्काचं आहे. छबीसारख्या चित्रपटाचे शो कमी करणं म्हणजे मराठी संस्कृती आणि मराठी कलाकारांचा अपमान आहे. जर यापुढे मराठी चित्रपटांचे शो थांबवले किंवा कमी केले, तर मनसे स्टाईल आंदोलन होईल आणि त्या सिनेमागृहाची छबीच बिघडेल.”
शैलेश शिर्के यांनी स्पष्ट केलं की, “मराठी चित्रपटांना नेहमी दुय्यम वागणूक दिली जाते. पण आता हे चित्र बदलायलाच हवं. मराठी सिनेमा म्हणजे महाराष्ट्राची ओळख आहे. त्याचा अपमान मनसे कधीही सहन करणार नाही.”
‘छबी’ या चित्रपटाला अलीकडेच उत्तम प्रतिसाद मिळत होता. अनेक शो हाऊसफुल्ल झाले होते. तरीसुद्धा शो कमी केल्याने प्रेक्षकांमध्ये नाराजी पसरली आहे. सोशल मीडियावरही अनेकांनी मिराज सिनेमागृहाच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रेक्षकांचे म्हणणे आहे की, “मराठी चित्रपटांना न्याय मिळायला हवा. जेव्हा प्रेक्षक येत आहेत, तेव्हा शो कमी करणं योग्य नाही.” मिराज सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाकडून या घटनेवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी, मनसेच्या इशाऱ्यानंतर वातावरण तापले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.