Diljit Dosanjh Concert: पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ याच्या मुंबईतील आगामी 'ओरा' या कॉन्सर्टवरून नवा वाद निर्माण झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) २७ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवर होणारा दिलजीतचा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी केली आहे. महालक्ष्मी रेसकोर्स आणि एनएससीआय डोम येथे होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये अमली पदार्थांचे सेवन आणि विक्री होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. मागणी मान्य न झाल्यास स्थानिक रहिवाशांसोबत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही पक्षाने दिला आहे.
मनसेने अमली पदार्थांबाबत काय आरोप केले?
मनसेचे विभागीय अध्यक्ष दिनेश ज्ञानेश्वर पुंडे यांनी यासंदर्भात ताडदेव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी महालक्ष्मी रेसकोर्स आणि एनएससीआय डोम येथे आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांबाबत चिंता व्यक्त केली आहे. मनसेच्या दाव्यानुसार, २२ नोव्हेंबर रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवर झालेल्या एका कार्यक्रमात १२ ते १३ व्यक्ती अमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी दोषी आढळले होते. तसेच, गेल्या वर्षी याच परिसरात अमली पदार्थांच्या सेवनामुळे एका तरुणाचा मृत्यू झाला होता. अशा कार्यक्रमांनंतर अनेक तरुण नशेच्या अवस्थेत रस्त्यावर आढळतात. त्यामुळे स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. कार्यक्रमांमुळे परिसरात वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होतात. त्यामुळे आम्ही महालक्ष्मी रेसकोर्स आणि एनएससीआय डोम येथे होणारा हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी करत आहोत. ही मागणी मान्य नाही केल्यास स्थानिक रहिवाशांसोबत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असे पत्रात लिहीण्यात आले आहे.
कॉन्सर्टसाठी बुकमायशोच्या कडक सूचना
दरम्यान, दिलजीतच्या कॉन्सर्टसाठी तिकीट विक्री करणाऱ्या 'बुकमायशो'ने प्रेक्षकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कार्यक्रमस्थळी बॅनर, पोस्टर्स, झेंडे, लायटर, लेझर पॉइंटर, स्प्रे, छत्र्या, पाण्याच्या बाटल्या आणि मोठ्या बॅगा नेण्यास मनाई आहे. तसेच कॅमेरे, ट्रायपॉड, सेल्फी स्टिक आणि ड्रोनवरही बंदी घालण्यात आली आहे. प्रेक्षकांना पॉवर बँक नेण्याची परवानगी आहे. औषधांसाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आणि प्रवेशासाठी सरकारी फोटो ओळखपत्र अनिवार्य आहे.
दिलजीतच्या कॉन्सर्टला बॉम्बची धमकी
विशेष म्हणजे, मुंबईतील कॉन्सर्टपूर्वी बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. २३ ऑक्टोबर रोजी बीएमसी कार्यालयाला ईमेलद्वारे २७ नोव्हेंबरच्या कार्यक्रमात आत्मघाती हल्ला करण्याची धमकी देण्यात आली होती. या ईमेलमध्ये अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाचाही उल्लेख होता. २६ नोव्हेंबर रोजी पुन्हा एक धमकीचा ईमेल समोर आला. यात अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान, दिलजीतचा कॉन्सर्ट आणि मुंबई मेट्रोला टार्गेट करण्यात आल्याचा उल्लेख केला आहे.
बेंगळुरू कॉन्सर्टलाही धमकी
मुंबईपाठोपाठ २९ नोव्हेंबर रोजी बेंगळुरूतील नाइस ग्राऊंड्स येथे होणाऱ्या दिलजीतच्या कार्यक्रमालाही बॉम्बची धमकी मिळाली आहे. ९ नोव्हेंबर रोजी हुबळी-धारवाड महानगरपालिका आयुक्तांना पाठवण्यात आलेल्या ईमेलमध्ये कॉन्सर्टदरम्यान आयईडी स्फोट घडवण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून सायबर टीमकडून तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.