मराठी सिनेसृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) आज आपला ६५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. सयाजी शिंदे यांनी फक्त मराठी सिनेसृष्टीतच आपले नाव कमावले नाही तर मराठीसोबतच हिंदी आणि साऊथ चित्रपटांमध्ये देखील त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सयाजी शिंदे यांचं भारदस्त व्यक्तिमत्व, साधं राहणीमान, उच्च विचारसरणी आणि दमदार अभिनय चाहत्यांना प्रचंड आवडतो.
आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून ते कधी प्रेक्षकांना हसवतात, तर कधी ते विलनची भूमिका साकारून प्रेक्षकांना घाबरवतात देखील. सयाजी शिंदे हे असे अभिनेते आहेत की त्यांच्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. आज आपण सयाजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त (Sayaji Shinde Birthday) फिल्मी करिअरसोबत त्यांच्या आयुष्याशी संबंधित बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत...
सयाजी शिंदे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वेळेकामठी या गावामध्ये १३ जानेवारी १९५९ साली झाला. शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या सयाजी शिंदे यांच्या घरची परिस्थिती बेताची होती. मावशी आणि बहिणीच्या मदतीने त्यांनी १० वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. घरची परिस्थिती लक्षात घेता त्यांनी गाव सोडलं आणि सातारा शहर गाठले. शिक्षण पूर्ण करता करता त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पाटबंधारे विभागामध्ये ३ वर्षे वॉचमनची नोकरी केली. तेव्हा सयाजी शिंदे यांचा दरमहा पगार १६५ रुपये होता. असे करता करता त्यांनी मराठी विषयात ग्रॅज्युएशन केले. कॉलेजमध्ये असताना ते नाटकामध्ये भाग घ्यायचे.
साताऱ्यात सयाजी शिंदे यांची भेट सुनील कुलकर्णी या रंगकर्मीशी झाली आणि खऱ्या अर्थाने सयाजी यांच्या अभिनय प्रवासाला तेव्हापासून सुरूवात झाली. त्यांनी १९७८ मध्ये मराठी एकांकिका स्पर्धेतून सर्वांसमोर वेगळी ओळख निर्माण केली. १९८७ मध्ये 'झुल्वा' नावाच्या मराठी नाटकात त्यांनी काम केले. या नाटकातील त्यांच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता सयाजी शिंदे यांनी नियमितपणे नाटकांमधून भूमिका करायला सुरूवात केली.
आपली नाटकाची आवड जपण्यासाठी ते मुंबईला आले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी खूप मेहनत घेतली आणि अभिनेता व्हायचे मनाशी ठरवले. मुंबईत अनेक थिएटर वर्कशॉप करत असतानाच त्यांनी अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले. थिएटर करत असतानाच त्यांना 'अबोली' या चित्रपटामध्ये काम मिळाले. या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मराठी नाटक आणि चित्रपटामध्ये काम करता करता सयाजी शिंदे यांचे नशीब पालटलं. त्यांना हिंदी चित्रपटाची देखील ऑफर मिळाली. राम गोपाल वर्मा यांच्या 'शूल' चित्रपटामध्ये त्यांना बच्चू यादवची भूमिका मिळाली. या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.